
अभिजित कोळपकर
It’s not greed that drives the world, but incentives. Greed is part of the formula, but the core of it is incentives.
- Warren Buffett
Never, ever, think about something else when you should be thinking about the power of incentives
- Charlie Munger
लोभः सदा विचिन्त्यो लब्धेभ्यः सर्वतो भयं दृष्टम्।
कार्यऽकार्यविचारो लोभविमूढस्य नाऽस्त्येव।।
- सुभाषित रत्नाकर
अर्थ : मनुष्याने लोभी असणे हे चिंतेचे कारण आहे. लोभी व्यक्तीच्या सभोवती नेहमी भीतीचे वातावरण असते. लोभी व्यक्ती चांगल्या आणि वाईटात फरक करण्याची क्षमता गमावतो. प्रसंगी अपराधसुद्धा करण्यास तो मागे-पुढे पाहात नाही आणि त्याला त्यामुळे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.
याचे खूप चांगले उदाहरण म्हणजे २००८ ची जागतिक मंदी आणि त्यामुळे लाखो लोकांनी गमावलेल्या नोकऱ्या याबाबत तुम्हाला माहिती असेल. घरांच्या किमतीचा कृत्रिम फुगवटा हा या मंदीमागचे प्रमुख कारण होते. घर विकत घेण्यासाठी ग्राहक बँकांकडून कर्ज घेतात. लोक विकत घेत असलेली घरे किंवा संपत्ती यांची किंमत कायम वाढतच राहणार आहे, या चुकीच्या गृहीतकावर विश्वास ठेवून बँकांनी प्रचंड प्रमाणात कर्जवाटप केले. त्यातही ज्यांची परतफेड करण्याची क्षमता नाही, त्यांनाही गृहकर्जं देण्यात आली. काहीही करून कर्जवाटप करायचे आहे म्हणून अक्षरशः NINJA प्रकारच्या कर्जदारांना कर्जवाटप करण्यात आले. (NINJA- No Income No Jobs).
शेवटी सर्व चुकीच्या गोष्टींचे होते तसे इथेही झाले. घरांच्या किमती नुसत्या वाढायच्याच थांबल्या नाहीत, तर अनेक ठिकाणी घरांचे भाव कोसळायला लागले. ‘‘आपल्या घराची किंमत ही त्यासाठी घेतलेल्या गृहकर्जापेक्षा कमी आहे, तर कर्ज परतफेड करण्यापेक्षा बँकांना ते घर जप्त करू देत, आपण हात वर करू,’’ अशी या बहुसंख्य कर्जदारांची मानसिकता झाली. त्यांनी कर्ज परतफेड करणे थांबवले. इन्व्हेस्टमेंट बँकांनी अशा सर्व सबप्राइम कर्जाची रक्कम एकत्र करून गुंतवणूक प्रॉडक्ट म्हणून गुंतवणूकदारांना विकली होती. बँका बुडायला लागल्या, बँकांच्या कर्जामध्ये गुंतवणूक केलेल्या इन्व्हेस्टमेंट बँका आणि त्यांचे गुंतवणूकदारसुद्धा बुडाले. जागतिक भांडवलाचे चलनवलन थांबले आणि लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या.
अत्यंत चाणाक्ष लोक चालवत असणाऱ्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये असे कसे झाले म्हणून अमेरिकी सरकारने या सर्व घोटाळ्यांची चौकशी केली व कालांतराने बँकिंग इंडस्ट्री व भांडवली बाजारात कठोर कायदे व सुधारणा केल्या.
सबप्राइम घोटाळ्यामागे प्रत्येक स्तरावर ‘प्रेरणा पूर्वग्रह’ कसा काम करत होता, ते आपण समजून घेऊ या.