मेजर जनरल संजीव डोगरा (नि.)
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (‘एनडीए’) मधील महिलांची पहिली तुकडी (२०२२) बाहेर पडणार. ‘एनडीए’मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलेली मुलगी सत्र पूर्ण केल्यानंतर आमूलाग्र बदलते. चेहेऱ्यावरचा आत्मविश्वास चटकन जाणवतो अन् मूल्यांचा संस्कारही. सध्याच्या सामाजिक वातावरणात आशेचा किरण वाटावा, असा हा उपक्रम. त्या परिवर्तनाची झलक दाखवणारे हे वर्णन.
पावसाचे दिवस होते. २०२२ मधील ही आठवण. पुणे रेल्वेस्थानकाच्या फलाटावर १९ मुली उतरल्या. लांबचा प्रवास करून आलेल्या. साधा पोषाख, हातात बॅगा, नसा आखडलेल्या, पण डोळ्यांत ‘ऐतिहासिक’ पुण्याबद्दलच्या अनेक अपेक्षा! दिखाऊपणा नव्हता; पण हृदयांत साहस होते.
छातीवर भरपूर पदके असलेले उंच, मिशीवाले ‘ड्रिल उस्ताद’ वाट पाहात होते. ते म्हणाले, ‘‘या क्षणापासून तुम्ही सर्वसामान्य नागरिक नाही. तुम्ही भारतीय सशस्त्र दलांचे प्रतिनिधित्त्व करताय. तुमच्या चालण्याबोलण्यात ते उतरू द्या! संपूर्ण देश तुम्हाला पाहतोय.’’ एकदम सगळ्यांचे लक्ष गेल्यामुळे काहीशा भांबावलेल्या मुली रांगेत उभ्या राहिल्या.