
काही वर्षांपूर्वीची ही कथा मला आठवतेय. वेळ अगदी सकाळी सहाची. पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लबवर लोक जेव्हा टेनिस बॅडमिंटन खेळायला येतात, त्या वेळी एक मनाने तरुण पण वयाने वृद्ध माणूस पळताना दिसतो. लोक कुतूहलाने सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे चौकशी करतात, की हे काय चालू आहे? सुरक्षा कर्मचारी अजून एक बॉम्ब टाकतात. ते सांगतात, की ते गृहस्थ आता नाही तर पहाटे चारपासून एकटे पळत आहेत.
मग थोड्या वेळाने टेनिसचा आनंद घेऊन लोक मैदानाकडे नजर टाकतात तर त्या माणसाबरोबर आता अजून २०-३० लोक पळताना बघायला मिळतात. साधारणपणे साडेसातच्या सुमारास टाळ्यांच्या गजरात माणूस पळायचा थांबतो. मग थोड्या वेळाने क्लबच्या क्रिकेट पॅव्हेलियनमध्ये छोटेखानी समारंभ होतो. पळणाऱ्या माणसाचे नाव असते जुगल राठी. व्यवसायाने माणूस चार्टर्ड अकाउंटंट असतो आणि ७०वा वाढदिवस डेक्कन जिमखाना मैदानाला पळत ७० चकरा मारून साजरा करत असतो.
जुगल राठी वयाच्या सत्तराव्या वर्षी असा कमाल उत्साह आणि तंदुरुस्ती दाखवतात तर मग आपण काय करतोय या शरमेने काही लोक शेवटच्या काही चकरा त्यांच्यासोबत पळू लागलेले असतात. एवढ्यात कोणीतरी कुजबुजते की या वयात असा वेडेपणा करायची काय गरज आहे? त्या टिप्पणीवर दुसरा जरा जास्त खुल्या आवाजात म्हणतो... मान्य आहे हा वेडेपणा आहे; पण निदान हा चांगला वेडेपणा आहे.