esakal | एक फ्लॅश बॅक, टोकियो १९६४
sakal

बोलून बातमी शोधा

Tokyo olympics}

एक फ्लॅश बॅक, टोकियो १९६४

sakal_logo
By
आ. श्री. केतकर

१९६४ मधील ऑलिंपिकचे जपानने इतके दर्जेदार आणि देखणे आयोजन केले होते, की त्याच्यावर चित्रपटही बनवला गेला व तो जगभर प्रदर्शित करण्यात आला. असे पहिल्यांदाच घडले असावे.

येत्या शुक्रवारपासून टोकियोमध्ये ऑलिंपिक सुरू होत आहे. सर्वच खेळाडू, क्रीडाप्रेमींसाठी ही आनंदाची घटना आहे. कारण कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेले ऑलिंपिक प्रथमच नियोजित वर्षानंतर एका वर्षाने सुरू होणार आहे. मात्र त्याचे ऑलिंपिक २०२० हे नाव कायम आहे, ते भावनिकदृष्ट्या. जपानला प्रथम ऑलिंपिक आयोजनाची संधी १९४० मध्ये मिळाली होती; पण महायुद्धामुळे ते झाले नाही. नंतर १९६४ मध्ये त्यांना ती मिळाली आणि त्यांनी आयोजनाचा एक आदर्शच घालून दिला. हे ऑलिंपिक इतके दर्जेदार आणि देखणे झाले की, त्याच्यावर चित्रपटदेखील बनवला गेला व तो जगभर प्रदर्शित करण्यात आला. असे पहिल्यांदाच घडले असावे.

भारतासह ९३ देश सहभागी झाले होते. भारतीय खेळाडूंची संख्या फक्त ५३ होती आणि त्यात स्टेफी डिसौझा ही एकमेव महिला धावपटू होती. त्या वेळी ऑलिंपिकमध्ये महिला खेळाडूंचे प्रमाण खूपच कमी होते. एकूण सहभागी देशांतील एकूण ५१५१ स्पर्धक होते. त्यांत ४४७३ पुरुष, तर केवळ ६७८ महिला होत्या. आता ५६ वर्षांनंतर यंदाच्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांचे प्रमाण ४९ टक्के एवढे झाले आहे.

म्हणजे आता खरोखरच समानता येत आहे. त्या वेळी भारत आठ खेळांत सहभागी होता; पण हॉकी वगळता बाकी सर्व खेळांत त्याची कामगिरी निराशाजनकच होती. हॉकी संघाने मात्र रोमला गमावलेले सुवर्णपदक संपादन केले, आणि देशभर जल्लोष झाला. २२ ऑक्टोबर १९६४, हा तो दिवस. भारताचे हॉकीतील आठवे सुवर्णपदक होते! त्यानंतर त्याला एकदाच, मॉस्को ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवता आहे. यंदा हॉकी संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, काय होते ते पाहायचे.

रोमच्या पराभवाची फेड

त्या वेळी हॉकी स्पर्धेतील ब गटातील भारताची कामगीरी अशी होतीः स्पेन १-१ बरोबरी, संयुक्त जर्मनी १-१ बरोबरी. हॉलंडवर २-१ विजय, मलेशिया ३-१ विजय, बेल्जियम २-० विजय, कॅनडा ३-० विजय आणि हाँगकाँग ६-० विजय. पाकिस्तानने मात्र साखळीतील सर्व सामने जिंकले होते. उपान्त्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ३-१ असा पराभव केला, तर पाकिस्तानने स्पेनला ३-१ असे हरवले. अंतिम सामन्यात त्यामुळेच पाकिस्तानची बाजू सरस समजण्यात येत होती. शिवाय तो रोम ऑलिंपिकचा विजेता होता आणि १९६२ च्या आशियाई स्पर्धांतही त्याने भारतावर मात केली होती. अपेक्षेनुसार अंतिम सामन चांगलाच चुरशीचा झाला.

मात्र मध्यंतरातील बरोबरीनंतर उत्तरार्धात प्रिथिपाल सिंगच्या जोरदार फटक्यानंतर चेंडू पेनल्टी क्षेत्रात मंझूर हसनच्या पायावर बसला आणि भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. मोहिंदर लालने बिनचूक फटका मारून गोल केला आणि काही वेळाने सामना संपला. भारताने सुवर्णपदक पुन्हा मिळवले होते. संघाचा कर्णधार चरणजीत सिंग होता. रोमच्या पराभवाची फेड टोकियोला झाली होती, म्हणूनच हा सामना संस्मरणीय झाला. सामन्याचा मानकरी गोलरक्षक शंकर लक्ष्मण ठरला, त्याने पाकिस्तानच्या मुनीर दारचे पेनल्टी कॉर्नरचे फटके अफलातूनपणे अडवले होते.

उधमसिंगने १९५२ आणि १९५६ नंतर तिसरे सुवर्णपदक मिळवून लेस्ली क्लॉडियसच्या ३ सुवर्ण आणि एक रौप्यपदकाशी बरोबरी साधली. या दोघांचे रौप्यपदक रोम ऑलिंपिकमधील होते. क्लॉडियसने १९४८, ५२ आणि ५६ मध्ये सुवर्णपदक मिळवले होते. भारताच्या विजयी संघाचे खेळाडू होतेः चरणजीत सिंग (कर्णधार), शंकर लक्ष्मण (गोलरक्षक), राजेंद्र खिस्ती, प्रिथिपालसिंग, धरमसिंग, गुरबक्षसिंग, मोहिंदर लाल, जगजीतसिंग, राजिंदरसिंग, जोगिंदरसिंग, हरिपाल कौशिक, हरबिंदरसिंग, बंडू पाटील, व्ही.जे.पीटर, उधमसिंग सैद अली आणि बलबीरसिंग कुल्लर.

तर अशा या ऑलिंपिकचा सिनेमा येत आहे आणि तो भारतातही प्रदर्शित होणार आहे, हे कळल्यानंतर खूपच आतुरता निर्माण झाली होती. तो चित्रपट रंगीत होता हे आणखी एक आकर्षण. पण सुरुवातीला तो पाहिलेल्या प्रेक्षकांची निराशा झाली होती, कारण त्यात हॉकी सामना काही मिनिटेच दाखवण्यात आला होता. पण त्यामुळे एक झाले, प्रेक्षकांची उत्सुकता जाणून घेऊन नंतर त्या सामन्याचे साधारण, बहुधा तासाभराचे चित्रण त्यात जोडण्यात आले.

मात्र हे जोडलेले चित्रण कृष्णधवल होते. (पण तरीही ते पाहण्यास मिळते आहे, हा आनंद मोठा होता!) ते बहुधा भारतीय माहितीपटांच्या विभागाने चित्रित केलेले असावे. हॉकी अंतिम सामन्याची जोड दिल्यामुळे एक झाले. ऑलिंपिकमधील भारताचा सुवर्णपदक खेचून आणणारा विजय थोडा उशिरा का असेना, प्रत्यक्ष पाहता येणार, हे कळल्यावर प्रेक्षकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. यंदा आपल्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी चांगली कामगिरी करून पदकसंख्या वाढवून त्या पुऱ्या कराव्या, हीच अपेक्षा.