

Maharashtra food security
esakal
भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अन्न सुरक्षा हा केवळ शेतीचा विषय नसून तो नागरिकांच्या अस्तित्वाशी संबंधीत घटक आहे. अन्न सुरक्षा म्हणजे केवळ धान्य उपलब्ध असणे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला सकस आहार रास्त दरात मिळणे होय. २०२४-२५ च्या हंगामात देशाने ३३ कोटी टनांहून अधिक विक्रमी अन्नधान्य उत्पादन केले असून महाराष्ट्र हे कडधान्ये आणि भरड धान्य उत्पादनात अग्रेसर राज्य राहिले आहे. असे असूनही, बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या महागाईमुळे या क्षेत्रासमोर नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. आजच्या परिस्थितीत शेवटच्या घटकापर्यंत अन्नाचा साठा पोहोचवणे ही एक मोठी प्रशासकीय कसरत ठरत आहे.
महाराष्ट्रातील अन्न सुरक्षेपुढील सर्वात मोठे संकट म्हणजे अनिश्चित निसर्गचक्र होय. राज्यातील बहुतांश शेती आजही मान्सूनवर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे वितरण विस्कळीत झाले असून त्याचा फटका खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांना बसत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे राज्यातील गहू आणि संत्रा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे, तर अवेळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या नैसर्गिक आपत्तींमुळे बाजारात अन्नाचा तुटवडा निर्माण होतो आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य माणसाच्या खिशावर होतो. हवामान बदलाच्या या संकटावर मात करण्यासाठी आता राज्यात हवामान-अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जात आहे.