esakal | विदेशी अभ्यासकांच्या नजरेतून ‘अयोध्या’
sakal

बोलून बातमी शोधा

Ayodhya }

विदेशी अभ्यासकांच्या नजरेतून ‘अयोध्या’

sakal_logo
By
सकाळवृत्त सेवा

अनेक विदेशी अभ्यासकांनी अयोध्येचा अभ्यास केला. नेदरलँडचे डॉक्टर हॅन्स बकर यांनी अयोध्या इतिहास हा सुमारे आठशे पानांचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये पाच मोठे नकाशे आणि छायाचित्रे आहेत. मशिदीच्या बाजूला जे उत्खनन झाले, त्यातील जुन्या स्तंभांची चित्रे त्यात आहेत.

कै. सेतुमाधवराव पगडी हे महाराष्ट्राचे ख्यातनाम संशोधक, विशेषतः इतिहास विषयाचे आणि पर्शियन उर्दू भाषा जाणणारे पंडित. निजामाच्या काळात ते काही वर्षे हैदराबादमध्ये होते. हैदराबाद संस्थान विलीन झाल्यावर ते मुंबईला आले. बराच काळ महाराष्ट्र सरकारच्या गॅझेटियरचे संपादक म्हणून काम केले. सातत्याने त्यांचे पुण्यात येणे आणि नातेसंबंधातून भेट होत असल्याने अनेक गोष्टी ऐकायला मिळत. श्री विठ्ठल आणि व्यंकटेश बालाजी, ‘पंढरपूरच्या विठ्ठलावर मुसलमानी आक्रमणे’ अशा विषयांवर त्यांनी वृत्तपत्रांसाठी मुलाखतीही दिल्या होत्या.

मुंबईत एकदा गीतरामायणाचा कार्यक्रम झाला. त्याला स्वतः कै. ग. दि. माडगूळकर उपस्थित होते. तेथे त्यांची भेट सेतुमाधवरावांशी झाली. अण्णा माडगूळकरांनी सेतुमाधवरावांना अयोध्येचा इतिहास ऐकवण्याची विनंती केली. या महान इतिहासकारांनी अयोध्या- बाबरी मशीद, रामलल्ला मंदिर, शरयू नदी, हिंदू- मुस्लिमांचे वाद हे सर्व लेखी स्वरुपात लिहून कळवले. या इतिहासाची माहिती त्यानंतर पुण्यातील एका अभ्यासकाने गीतरामायणाची आवृत्ती काढताना प्रस्तावनेत दिली. अर्थात या गोष्टीला 25-30 वर्षे झाली.

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीची वास्तू उद्‍ध्वस्त झाली, जगभर कोलाहल झाला. जातीयवादी संघटनांचे दंगे, राजकीय उलथापालथ आणि बरेच काही घडले... आणि आता न्यायालयीन आदेशातून राममंदिर पुन्हा उभारण्यास सुरुवात झाली. गतवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाले. लोकांनी या धर्मकार्याला भरभरून आर्थिक साहाय्य केले. आता आम्ही वाट पाहतो आहोत, अयोध्या मंदिरातील रामप्रभूचे दर्शन घेण्याची..!

नेदरलँडच्या ग्रोनिंगगेन विद्यापीठातील डॉ. हॅन्स बकर या विदेशी अभ्यासकाने आशियातील धर्मस्थळे आणि त्यांच्या यात्रा-जत्रा असा विषय घेऊन 1976 मध्ये अयोध्येला भेट दिली होती. 1980-1981 मध्ये अयोध्येवर काम करण्यासाठी विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेऊन डॉ. बकर अभ्यासाची साधने शोधण्यासाठी पुण्यात आले. भांडारकर संस्था, डेक्कन कॉलेज, भारत इतिहास मंडळ, तसेच एशियाटिक सोसायटी (कोलकता), वृंदावन रिसर्च इन्स्टिट्यूट (वृंदावन) आदी केंद्रांतून प्राचीन अयोध्या महात्म्ये मिळविली. वाराणसीचे काही संस्कृत पंडित आणि अयोध्येचे विद्वान पं. रामरक्ष त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू केले. त्यांच्या मते, रामाची अयोध्या आणि कृष्णाचे वृंदावन ही दोन्ही क्षेत्रस्थाने एकाच वेळी विकसित होत गेली.

1983 मध्ये पुन्हा ग्रोनिंगगेन विद्यापीठाची एक वर्षाची शिष्यवृत्ती घेऊन हॅन्स यांनी अयोध्येवर संशोधनात्मक पीएच. डी. केली. सुमारे 800 पानांचा प्रबंध 1984 मध्ये विद्यापीठाला सादर केला. 1986 मध्ये नेदरलॅंडमध्ये (हॉलंड) तो छापून प्रसिद्ध झाला. पण आजतागायत त्याची छापील प्रत महाराष्ट्रात कोठेही पहावयास मिळालेली नाही. मात्र, ग्रंथाचे स्वरूप काय, हे त्याने कळवले होते.

अयोध्या इतिहास हा ग्रंथ सुमारे आठशे पानांचा आहे. त्यामध्ये पाच मोठे भौगोलिक नकाशे आणि 10-15 विविध फोटोग्राफ‌ आहेत. महत्त्वाचे म्हणजे मशिदीच्या बाजूला जे उत्खनन झाले, त्यात सापडलेल्या जुन्या स्तंभांची चित्रे त्यात आहेत. माहिती क्रमशः अशी...

1) इ.स. पूर्व 600 पासून इ.स. 1000 पर्यंतचा अयोध्येचा सर्वांगीण इतिहास, 2) अकराव्या शतकातील साकेत- अयोध्येचा धार्मिक विकास, 3) अकराव्या व बाराव्या शतकातील विविध घडामोडी आणि त्याचे परिणाम, 4) वैष्णव संप्रदायाने लोकप्रिय केलेली रामोपसना, 5) अगस्त्य संहितेतील रामोपसना, 6) अयोध्येचा विकास, रामपंथाचा उदय आणि व्यापकता, 7) तेरावे ते अठरावे शतक काळातील अयोध्या विकास, 8) शेवटचे प्रकरण अलिकडील घडामोडी. विशेष म्हणजे एका पाश्‍चात्त्य विद्वानाने असा चिकित्सात्मक अभ्यास करून तो लोकासमोर मांडला.

नंतर याच नेदरलॅंडच्या प्रा. एरिक सॅंड यांनी पंढरी माहात्म्याचा चिकित्सक अभ्यास करून 2010 च्या सुमारास क्षेत्र पंढरपूर- श्रीविठ्ठलदैवत आणि वारकरी संप्रदाय यावर संशोधनात्मक काम केले. प्रसिद्ध झाले की नाही, याची माहिती नाही. परंतु या महाभागाने गळ्यात तुळशीमाळ घालून आळंदी ते पंढरपूर पायी यात्रा केली आणि त्या काळात हा विदेशी वारकरी गाजला.

(वा. ल. मंजूळ- लेखक हे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)