esakal | खरंच कोलकत्याच्या अंधारकोठडीमध्ये ब्रिटिशांना कोंडले होते?
sakal

बोलून बातमी शोधा

British}

खरंच कोलकत्याच्या अंधारकोठडीमध्ये ब्रिटिशांना कोंडले होते?

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

भारतातील ब्रिटिश राजवटीचा इतिहास सर्वांना माहीत आहे. ब्रिटिशांनी व्यापारी म्हणून भारतात दाखल होऊन आपल्या कूटनीतीने साम्राज्यविस्तार केल्याचेही सर्वांना माहीत आहे. अनेक संस्थाने, राजांच्या कब्जातील सत्ता काबीज करण्यासाठी ब्रिटिशांची दुष्ट खेळी जगविख्यात आहे. प्रसंगी इतिहासाच्या पानातही भारतातील राजवटीबाबत चुकीचे पद्धतीने लिखाण करून ब्रिटिश साम्राज्यवाद भारतात का आवश्‍यक आहे, हेही दर्शविण्यात इंग्रज कुठे कमी पडले नाहीत. हेच पाहा ना, असे म्हटले जाते, की इंग्लंडमधील कोणत्याही शाळेतील मुलास भारताबद्दल तीन गोष्टी माहीत असतात, अंधारकोठडी (ब्लॅक होल), प्लासीची लढाई आणि 1857 विद्रोह. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोघल साम्राज्य वेगाने कमी होऊ लागला आणि तांत्रिकदृष्ट्या मुघल साम्राज्याचा भाग असूनही बंगाल एक प्रकारचा स्वतंत्र प्रांत बनला. जेव्हा ब्रिटिश व फ्रेंचांनी तेथील कारखान्यांची तटबंदी सुरू केली, तेव्हा नवाब सिराज-उद-दौलाला वाटले, की त्याने दिलेल्या अधिकाराचा ब्रिटिशांकडून दुरुपयोग होत आहे. त्याने त्याचा जाब विचारला. ब्रिटिशांच्या उत्तरावर सिराज-उद-दौला समाधानी नव्हता. मग 16 जून 1756 रोजी त्याने कोलकतावर हल्ला केला. जेव्हा इंग्रजांचा पराभव निश्‍चित झाल्याचे दिसून आले, तेव्हा गव्हर्नर जॉन ड्रेक आपल्या सेनापतीसह त्याच्या बहुतेक सदस्य, महिला आणि मुले यांना घेऊन हुगली नदीत थांबलेल्या जहाजात बसून पळून गेला. मात्र या घटनेनंतरचा इतिहास ब्रिटिशांनी वेगळ्याच पद्धतीने मांडला.

ब्रिटिशांचे आत्मसमर्पण

कोलकता सैन्याच्या को-कॉन्सिलचे कनिष्ठ सदस्य जोनाथन हॉलवेल याला सोडण्यात आले. 20 जून, 1756 रोजी, सिराज-उद-दौलाच्या सैनिकांनी फोर्ट विलियमच्या भिंती तोडल्या आणि त्यात प्रवेश केला व संपूर्ण ब्रिटिश सैन्य त्यांना शरण गेले. एस. सी. हिल यांनी आपल्या "बंगाल इन 1857-58' या पुस्तकात लिहिले आहे, की सिराज-उद-दौलाने फोर्ट विलियमच्या मध्यभागी त्याचा दरबार ठेवला होता. तेथे त्याने कोलकताचे नाव अलिनगर ठेवण्याचे जाहीर केले. यानंतर त्याने राजा माणिकचंद यांना किल्ल्याचा रक्षक म्हणून घोषित केले. त्यांनी ब्रिटिशांनी बांधलेले शासकीय घर पाडण्याचे आदेशही दिले. ते म्हणाले, की ही इमारत राजकुमारांसाठी उपयुक्त आहे ना व्यापाऱ्यांसाठी.

ब्रिटिश सैनिकाने गोळीबार केला

नंतर जे. झेड. हॉलवेलने बंगालच्या प्रांताशी संबंधित "इंटरेस्टिंग हिस्टोरिकल इव्हेंटिकल इव्हेंट्‌स'संबंधी आपल्या लेखात लिहिले आहे, की हात बांधून मला नवाबासमोर सादर केले गेले. नवाबाने माझे हात खोलण्याचे आदेश दिले आणि मला वचन दिले, की माझ्यावर अत्याचार केला जाणार नाही. त्याच वेळी नवाबाने ब्रिटिशांचा प्रतिकार व गव्हर्नर ड्रेक यांच्या वर्तनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. थोड्या वेळाने सिराज-उद-दौला तेथून उठला आणि इंग्रजांच्या वैडरबर्नच्या घरामध्ये विश्रांती घेण्यासाठी गेला.

एस. सी. हिल यांनी लिहिले की, "नवाबाच्या काही सैनिकांनी एकप्रकारे नियंत्रित लूट सुरू केली. त्यांनी काही ब्रिटिशांना लुबाडले पण त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही. त्यांनी काही पोर्तुगीज आणि सैनिकांना खुले सोडले आणि फोर्ट विलियममधून बाहेर आले. पण काही तासांत सायंकाळ होता होता हॉलवेल आणि इतर कैद्यांसह नवाबाच्या सैनिकांचे वागणे बदलले. असे घडले, की एका ब्रिटिश सैनिकाने नशेत असताना पिस्तूल बाहेर काढून नवाबाच्या एका सैनिकाला ठार मारले.

ब्रिटिशांना अंधारकोठडीत ठेवले गेले

ही तक्रार सिराज-उद-दौलापर्यंत पोचताच त्याने विचारले, की गैरव्यवहार करणाऱ्या ब्रिटिश सैनिकांना कोठे ठेवले आहे? तेव्हा त्यांना सांगण्यात आले, की अंधारकोठडीत. त्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, की इतक्‍या मोठ्या संख्येने असणाऱ्या कैद्यांना रात्रभर खुले सोडणे धोकादायक आहे. म्हणून त्यांना अंधारकोठडीत ठेवणे चांगले. तेव्हा सिराज-उद-दौलाने ब्रिटिश सैनिकांना अंधारकोठडीत ठेवण्यास सांगितले. एकूण 146 ब्रिटिशांना त्यांची श्रेणी व लिंग विचारात न घेता एका 18 बाय 14 फूट कोठडीत कोंबले गेले होते, ज्यामध्ये फक्त दोन लहान खिडक्‍या होत्या. ही कोठडी केवळ तीन किंवा चार कैद्यांना ठेवण्यासाठीच बनवली गेली होती.

हॉलवेलने लिहिले की, "ती कदाचित वर्षाची सर्वांत उष्ण आणि दमट रात्र होती. 21 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत हे सर्व कैदी अन्न, पाणी आणि हवेविना त्या खोलीत बंद राहिले.' ब्रिटिश सैनिकांना हा त्रास सायंकाळी सात वाजल्यापासून सुरू झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत चालला. एस. सी. हिलच्या शब्दांत सांगायचे तर, "या कैद्यांवर पहारा ठेवण्यासाठी ठेवण्यात आलेले सैनिक झोपलेल्या नवाबाला उठवून ब्रिटिश सैनिकांची अवस्था सांगण्याची हिंमत करीत नव्हते. जेव्हा सिराज-उद-दौला स्वत: जागा झाला आणि त्याला या कैद्यांची अवस्था सांगण्यात आली, तेव्हा त्याने अंधारकोठडीचा दरवाजा उघडण्याचा आदेश दिला. जेव्हा दार उघडले तेव्हा 146 कैद्यांपैकी केवळ 23 कैदी मरणासन्न अवस्थेत जिवंत बाहेर आले. तेव्हा जवळच एक खड्डा खोदून मृतदेह कोणत्याही विधीविना एकत्र पुरण्यात आले.

सुरक्षा कर्मचाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न

हॉलवेलने लिहिले, की केवळ एका वृद्ध सुरक्षा रक्षकाने त्यांच्याप्रति दया दाखविली. मी त्याला विनम्रपणे विचारले, की दुसऱ्या खोलीत अर्ध्या लोकांना बंद करून आमचे त्रास थोडे वाचवा. या बदल्यात मी तुम्हाला सकाळी एक हजार रुपये देईन. त्याने आश्वासन दिले, की आपण प्रयत्न करू. पण थोड्या वेळाने तो परत आला आणि त्याने असे करणे शक्‍य नाही असे सांगितले. मी पुन्हा दोन हजार देण्याचे आश्‍वासन दिले. तो दुसऱ्यांदा गायब झाला पण नंतर परत आला आणि म्हणाला, की त्यांची मागणी नवाबाच्या आदेशाशिवाय पूर्ण करता येणार नाही आणि नवाबांना जागे करण्याची हिंमत कोणाला नाही.'

गुदमरल्यामुळे झाला मृत्यू

रात्री नऊ वाजता लोकांना तहान जाणवायला लागली तेव्हा परिस्थिती आणखीच बिकट होऊ लागली. एका वृद्ध सैनिकाला त्यांच्यावर दया आली आणि त्याने थोडे पाणी आणले. खिडकीच्या सळईंच्या माध्यमातून पाणी आत आणले. हॉलवेल पुढे लिहितो, "माझे काय हाल होत होते मी कसे सांगू? दुसऱ्या खिडकीजवळ उभे असलेल्या काही लोकांनी पाण्याच्या आशेने ती खिडकी सोडली. ते पाण्यासाठी वेगाने पळत गेले आणि त्यांनी अनेकांना वाटेत चिरडले. माझ्या लक्षात आलं की थोड्याशा पाण्याने त्याला दिलासा देण्याऐवजी तहान वाढविली आहे. "हवा हवा'चा आवाज सर्वत्र गुंजत होता. रागाच्या भरात त्यांच्यावर गोळ्या घालून त्यांचे दुःख कायमचे संपवून टाकतील, असे चांगले व वाईट विचार करून सैनिकांना चिथावणी दिली. पण अकरा वाजेपर्यंत त्यांची सर्व शक्ती संपली. उष्णतेमुळे गुदमरल्यासारखे झाले आणि ते एकमेकांवर पडून जीव सोडत होते.'

आठवणीसाठी बनवले स्मारक

हॉलवेलने नंतर मृत झालेल्यांच्या स्मरणार्थ तेथे स्मारक उभारले. काही वर्षांनंतर वीज कोसळल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे विटांचे स्मारक 1821 मध्ये फोर्टविलियमचे तत्कालीन गव्हर्नर जनरल फ्रान्सिस हेस्टिंग्स यांनी पाडले. 1902 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने या मृतांच्या स्मरणार्थ आणखी एक संगमरवरी स्मारक डलहोजी स्क्वेअर येथे (आजचे बिनॉय, बादल, दिनेश बाग) अंधारकोठडीपासून थोड्या अंतरावर उभे केले. लोकांच्या मागणीनुसार 1940 मध्ये ते सेंट जॉर्ज चर्चच्या प्रांगणात हलविण्यात आले, जिथे ते आजही अस्तित्वात आहे. काही इतिहासकारांनी हॉलवेलने दिलेल्या वर्णनावर प्रश्न केला आहे. एस. सी. हिल यांनी लिहिले, की "हॉलवेलने नमूद केलेल्या 123 मृतांपैकी आमच्याकडे केवळ 56 लोकांची नोंद आहे.'

मृत्यूची संख्या अतिशयोक्ती असल्याचा आरोप

भारताचे प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार यांचा असा विश्वास आहे, की हॉलवेलने आपल्या वर्णनात मृत्यूची संख्या अतिशयोक्ती केली होती. जदुनाथ सरकार आपल्या "बंगालचा इतिहास' या पुस्तकात लिहितात की, या युद्धामध्ये बरेच ब्रिटिश मारले गेले होते, म्हणून सिराज-उद-दौलाला इतके ब्रिटिश मिळण्याचा प्रश्न उद्भवत नाही. नंतर, एक जमीनदार भोलानाथ चंद्र यांनी 18 बाय 15 फूट जागांवर बांबूची वर्तुळ बनवून ब्रिटिश सैनिकांना एकत्र केले होते. ही संख्या 146 पेक्षा खूपच कमी असल्याचे आढळले. हॉलवेलच्या वर्णनात त्या काळातील कोठारातील सर्व मृत असे दर्शविले गेले, की जे आधीपासूनच लढाईत मारले गेले होते किंवा ज्यांचे अस्तित्व किंवा रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद नाही.'

प्रसिद्ध इतिहासकार विल्यम डेलरिंपिल यांनी अलीकडेच प्रकाशित केलेल्या "द एनार्की' या पुस्तकात लिहिले आहे, की "अलीकडील संशोधनानुसार, 64 जणांना त्या अंधारकोठडीत ठेवले गेले होते, ज्यात 21 लोकांचे प्राण वाचले होते. या घटनेनंतर 150 वर्षांनंतरही ब्रिटिश शाळांमध्ये हे भारतीय लोकांच्या क्रौर्याचे उदाहरण म्हणून शिकवले गेले. परंतु गुलाम हुसेन खान यांच्यासह तत्कालीन इतिहासकारांच्या लेखनात या घटनेचे वर्णन नाही.

इंग्रजांमध्ये राग

ही घटना इतिहासाच्या पानांमध्ये हवी तशी रंगवली गेली, परंतु याचा वापर ब्रिटिश राष्ट्रवादाला चालना देण्यासाठी केला गेला. 7 ऑक्‍टोबर 1756 रोजी रॉबर्ट क्‍लाइव्ह याने संसदेचे सदस्य विल्यम मॉबट यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "या घटनेच्या सुनावणीवेळी प्रत्येकजण दुःख, भय आणि निराशेने भरलेले आहे. हा राग विशेषतः सिराज-उद-दौलाबद्दल आहे, ज्याने आपल्याकडून कोलकता काढून घेतला आहे आणि जो आपल्या देशवासीयांचा मारेकरी आहे. कोलकता सहजतेने ताब्यात घेण्यात आला, तो आमचा अपमान झाला आहे.

ब्रिटिशांचा सन्मान परत यावा आणि या घटनेचा बदला घेतला गेला पाहिजे, ही भावना ब्रिटिश वर्तुळात सर्वत्र होती. निकोलस डर्क्‍स यांनी आपल्या "कास्ट्‌स ऑफ माइंड कोलोनियलिज्म एंड मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया' या पुस्तकात लिहिले आहे की, "ब्लॅक होल एक आख्यायिका बनली आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या शूर व्यापाऱ्यांवर भारतातील लोकांनी जुलूम केल्याचे चित्र रंगवण्यात आले. या घटनेच्या एक वर्षानंतर लंडनला ही बातमी कळली, तीही जेव्हा हॉलवेल स्वत: जहाजातून तेथे पोचला. नंतर ही घटना 1757 मध्ये नवाब सिराज-उद-दौलावर हल्ला करण्यासाठी निमित्त म्हणून वापरली गेली.

हॉलवेलने दिलेल्या वर्णनावर प्रश्न

नंतर एच. एच. डॉडवेल यांनी आपल्या "क्‍लिव्ह इन बंगाल 1756-60' या पुस्तकात लिहिले आहे, की "हॉलवेल, कुक आणि या घटनेविषयी लिहिलेल्या इतरांचे वर्णन बनावट होते. फोर्टविलियमवरील हल्ल्यात यापैकी बहुतेक लोक ठार झाले. निकोलस डर्क्‍स यांनी लिहिले, की "ब्लॅक होल इव्हेंटच्या 14 वर्णनांपैकी सर्व वर्णने हॉलवेलच्या खात्यातून काढली गेली आहेत, तर चौदावे विवरण घटनेनंतर सोळा वर्षांनंतर लिहिले गेले.' अंधारकोठडीच्या या घटनेवर गंभीर इतिहासकारांना शंका आहे. त्यांचा असा विश्वास आहे, की हे लोक अंधारकोठडीत मारले गेले नाहीत तर युद्धात मारले गेले.

दुसरा इतिहासकार व्हिन्सेंट ए. स्मिथ यांनी "ऑक्‍सफर्ड हिस्ट्री ऑफ इडिया फ्रॉम अरलियर टाइम्स टू द एंड ऑफ 1911' या पुस्तकात लिहिले की, "हा प्रसंग घडून आला पण काही विसंगती आढळतात. नवाब सिराज-उद-दौला या क्रौर्याला वैयक्तिक आणि थेट जबाबदार नव्हता. कैद्यांचे काय करावे, हे त्याने आपल्या अधीनस्थांवर सोडले होते. या कैद्यांना त्या लहान खोलीत ठेवण्याचा आदेश सिराज-उद-दौलाने दिला नाही; परंतु हे देखील सत्य आहे की त्याने या पाशवी कृत्याबद्दल आपल्या अधीनस्थांनाही शिक्षा केली नाही किंवा त्याबद्दल शोक व्यक्त केला नाही.

ब्रिटिश साम्राज्यवादाला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न

अंधारकोठडीची ही घटना केवळ ब्रिटिश साम्राज्यवादाचा विस्तार करण्याचे मुख्य कारण असल्याचे म्हटले गेले नाही, तर त्याच्या आधारे भारतात ब्रिटिश राजवट बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पण भारतात ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळताच ही घटना इतिहासाच्या कुंडातही गेली. या घटनेच्या एका वर्षाच्या आत रॉबर्ट क्‍लाइव्हने केवळ कोलकता ताब्यात घेतला नाही तर प्लासीच्या युद्धात सिराज-उद-दौलाचा पराभव करून भारतात ब्रिटिश राजवटीची पायाभरणी केली.

go to top