
विवेक पंडित
pvivek2308@gmail.com
वेठबिगार आणि शेतमजूर हे दोन्ही एकजीव होणं गरजेचं होतं. दहिसरमधल्या शेतमजुरांसाठी मुक्त वेठबिगारांच्या संघर्षातील यशाने एका पद्धतीने आम्हाला बळ मिळवून दिलं होतं. गेले काही महिने संघर्ष करीत आम्ही जी वाट चाचपडत होतो, ती स्पष्ट, स्वच्छ व्हायला लागली होती. शेतमजुरांना संघटित करण्याकरिता प्रयत्न करायचं आम्ही ठरवलं. संपाच्या विजयानंतर आमच्यामध्ये तर कित्येक हत्तींचं बळ संचारलं. आमचा विश्वास अधिक दृढ झाला. अहिंसेने लढा देऊन तो जिंकताही येऊ शकतो, हा विश्वास मनात घट्ट रुजायला सुरुवात झाली.
मुक्तीच्या आधी संघर्ष असतोच. मग तो संघर्ष रस्त्यावरचा असेल वा ज्ञानेश्वर, बुद्धांसारखा एकांतातला आंतरिक संघर्ष असेल. जरा वार्धक्याच्या सत्याच्या प्रकटीकरणातून वृद्धाला प्राप्त झालेली वा उपेक्षेच्या आंतरिक संघर्षातून ज्ञानेश्वरांना समाधीचं द्वार लावल्यावर मिळालेली मुक्ती असो. आधी संघर्ष मग मुक्ती. संघर्षाविनाची मुक्ती बाह्यांगी मुक्ती वाटली तरी ही वरवरची भ्रामक मुक्ती असते.