
एकत्र कुटुंबात असतो तसा ऐक्याचा, सहभावनेचा पीळ सुटला तसा सिनेसृष्टीतील स्टुडिओ सिस्टीमचा चिरा ढळला. समर्पित सिनेव्यवसायाला धंद्याचे स्वरूप कधी आले ते कळले नाही. स्वातंत्र्यानंतर तर पावसाळी छत्र्यासारख्या कंपन्या उगवल्या. चित्रपट पडले, चालले, पण तरुणाईने भारतीय चित्रपटाचा अश्वत्थ नित्य सळसळत ठेवला. राज कपूर, गुरुदत्त, बिमल रॉय मैदानात उतरले. वैजयंतीमाला, मीनाकुमारी, नूतन, मधुबाला, नर्गिस, नलिनी जयवंतसारख्या षोडशी आल्या आणि शकील लिहून गेले - झूले में पवन के आयी बहार...
चित्रपटांची लोकप्रियता पाहून अनेक लोक या व्यवसायात येण्याची स्वप्नं पाहू लागले. दिल्लीचे एक श्रीमंत उद्योगपती सिनेमा काढायचा म्हणून संगीतकार नौशाद यांच्याकडे आले. ‘फिल्मकार’ नावाची कंपनी स्थापन केली आणि नौशाद साहेबांना म्हणाले, ‘‘माझी इथं कुणाची ओळख नाही; पण तुम्हीच सगळे जुळवून आणा. संगीत तुम्ही द्या. दिलीपकुमार, नर्गिसला घ्या. काही करा पण एक फिल्म करा.’’ नौशाद साहेबांनी सिनेमाचं काहीही ठाऊक नसेल तर यात पडू नका, असा सल्ला दिला; पण ते श्रीमंत उद्योगपती काही ऐकेनात. अखेर खुद्द नौशाद साहेबांनी कथा लिहिली.