

Digital Lending and Gen Z Financial Aspirations
esakal
सुचेता दलाल - foundation@moneylife.in
‘जेन झी’च्या आर्थिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कर्जव्यवस्थेचा विस्तार महत्त्वाचा आहे. डिजिटल वित्तीय सेवा, औपचारिक कर्जपुरवठा आणि छोट्या रकमेच्या कर्जांची सहज उपलब्धता यांमुळे अनेकांना नव्या संधी मिळू शकतात. मात्र, त्याचबरोबर कर्जदाराचे स्थिर उत्पन्न किंवा कमाई, आधीची देणी आणि परतफेडीची क्षमता यांचा विचार करणेही आवश्यक आहे. डिजिटल कर्जामुळे तरुणांसाठी आर्थिक संधींची दारे खुली झाली आहेत. मात्र, एकामागून एक घेतली जाणारी छोटी कर्जे, उत्पन्नाच्या तुलनेत वाढणारे हप्ते आणि कर्जाफेडीचा प्रत्यक्ष खर्च यांचा विचार न केल्यास आर्थिक सबलतेचे रूपांतर कर्जाच्या दुष्टचक्रात होऊ शकते.
तरुणाईच्या आकांक्षा, शिक्षण, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांभोवती गेल्या काही काळात देशात मोठी चर्चा सुरू आहे. परीक्षांमधील अनियमितता, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि भविष्याविषयीची अनिश्चितता यांमुळे तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जात असतानाच, भांडवल आणि वित्तसेवा क्षेत्राने या तरुणाईकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली आहे. बँका, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आणि डिजिटल कर्जपुरवठादारांसाठी ‘जेन झी’ ही ग्राहकांची एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे.
युवक, असंघटित कामगार, ग्रामीण भागातील कुटुंबे आणि छोटे उद्योजक यांच्यापर्यंत औपचारिक कर्जव्यवस्था पोहोचायला सुरुवात आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. इक्विफॅक्स या पतमानांकन संस्थेने आपल्या अहवालात या बदलाला ‘आकांक्षी भारत’ असे संबोधले आहे. पूर्वी औपचारिक अर्थव्यवस्थेपासून लांब असलेल्या व्यक्तींना आता सहज कर्ज मिळू लागणे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. मात्र, या चित्राची दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे. कर्ज मिळण्याची क्षमता वाढीस लागणे आणि ते कर्ज परतफेडण्याची क्षमता कमावणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.