

Gen Z freedom debate
esakal
विठ्ठल काळे - mailvitthalkale@gmail.com
‘जेन झी’कडून राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक इत्यादी विविध पातळ्यांवर बदलाची अपेक्षा केली जात आहे; पण त्यांच्यावरील ओझं आपण कमी केलं पाहिजे. त्यांना मुक्त जगू दिलं पाहिजे... ते या मुक्तपणातूनच नवीन समाज निर्माण करतील.
डार्विनच्या उत्क्रांतीच्या नियमाला मनुष्यप्राणी अपवाद नाही. पिढी दर पिढी मनुष्य उत्क्रांत होत चालला आहे आणि ही उत्क्रांत होण्याची प्रक्रिया चालूच राहणार आहे. म्हणूनच प्रत्येक पिढीला येणारी नवीन पिढी ही आपल्यापेक्षा वेगळी वाटते ती याचसाठी असेल. (खरं तर प्रत्येक जुन्या पिढीला, नवीन पिढी ही वाया गेलेली, बिनकामाची वाटते आणि हे पूर्वापारपासून सुरू आहे.)
जुनी पिढी नव्या पिढीकडून बऱ्याच अपेक्षा ठेवून असते; परंतु आताच्या जेन झी (GenaZ) पिढीकडून आधीच्या पिढ्यांनी जरा जास्तच अपेक्षा ठेवल्या आहेत, असं वाटत नाही का? सगळं काही त्यांच्या शिरावर आणून ठेवलं आहे. क्रांती करतील, तर तेच करतील... बदल घडवून आणतील, तर तेच आणतील अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकून आधीच्या पिढ्या निश्चिंत आहेत. जबाबदाऱ्या असल्याच पाहिजे; परंतु आवाक्याच्या बाहेरच्या जबाबदाऱ्यांचं ‘ओझं’ होतं. जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली पिढी दबून जाते. मग अशी दबलेली पिढी किती मोकळेपणाने काम करू शकेल?