

Geoeconomics and Global Power
esakal
श्रीराम कुंटे - kunteshreeram@gmail.com
भू-आर्थिक परिस्थिती अमेरिकेसाठी सगळ्यात जास्त अनुकूल आहे. तिच्याकडे आजही डॉलरची ताकद, जगातलं सर्वांत जास्त तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन आणि शक्तिशाली तंत्रज्ञान कंपन्या आहेत. डॉलरला आव्हान द्यायचा प्रयत्न चीन आणि इतर काही देशांनी सुरू केले आहेत; पण येता काही काळ तरी डॉलरचं जगावर वर्चस्व राहील.
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये तांदळाच्या दाण्यापेक्षा छोट्या डायोड आणि ट्रान्झिस्टरने जगातल्या कार उद्योगाला हवालदिल केलं होतं. कटिंग चहाच्या किंमतीएवढ्या डायोडशिवाय कारमधल्या अनेक गोष्टी काम करत नाहीत. हे डायोड बहुतांशी नेक्सपिरिया नावाच्या डच कंपनीकडून येतात. २०१९ मध्ये विंगटेक नावाच्या चिनी कंपनीने ती विकत घेऊन बहुतेक उत्पादन चीनमध्ये हलवलं. आपली चूक डच सरकारच्या लक्षात आली.
या सरकारनं ३० सप्टेंबर २०२५ रोजी एका जुन्या विस्मृतीत गेलेल्या कायद्याचा वापर करून महत्त्वाचं तंत्रज्ञान चीनला जातंय असं सांगून कंपनीच्या निर्णयांवर आपलं वर्चस्व आणलं. चीननं लगेच नेक्सपिरियाच्या चिनी कारखान्यातून होणारी निर्यात थांबवली. जगभरातले कारचे कारखाने बंद पडायची वेळ आली. अखेर नोव्हेंबरमध्ये समेट झाला आणि नेक्सपिरियाची निर्यात पुन्हा सुरू झाली. पारंपरिक युद्धापेक्षा हे नवं युद्ध जास्त गंभीर असू शकतं याची ही चुणूक होती.
मागच्या लेखात आपण ऊर्जेचं भू-राजकारण पाहिलं. या लेखात आपण एकूणच भू-अर्थकारण म्हणजे काय? ते कसं काम करतं यांबद्दल बघू या.