
चित्रकार, कवी आणि नाटककार डॉ. गीव्ह पटेल यांनी चित्रं काढली, कविता केल्या, नाटकं लिहिली, शिल्पं बनवली आणि शालेय मुलांसाठी कवितालेखनाच्या कार्यशाळाही घेतल्या. त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन सध्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात सुरू आहे. दुसऱ्या एका प्रदर्शनात ‘माणिक बाग’चे एकार्ट मुथेशियस आणि इतरांनी काढलेले ऐतिहासिक फोटोही पाहायला मिळतात.
भारताच्या आणि कदाचित जगभरच्या कलाक्षेत्रात दोन प्रकारचे कलाकार आढळतात. एक, ज्यांनी कलेचं अधिकृत शिक्षण घेतलं आहे ते आणि दुसरे, ज्यांनी स्वयंप्रेरणेने कलेची साधना केली अन् उच्च दर्जाची कला निर्माण केली ते. मराठीच्या कलाक्षेत्रात तर डॉक्टर मंडळींचं योगदान लक्षणीय आहे. मराठी रंगभूमीच्या संदर्भात चटकन आठवणारी नावं म्हणजे डॉ. काशीनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, डॉ. जब्बार पटेल वगैरे. असा प्रकार चित्रकलेच्या क्षेत्रातही दिसून येतो. चित्रकार डॉ. सुधीर पटवर्धन हे चटकन आठवणारं नाव.