
सध्या जगाची लोकसंख्या जवळपास ८२० कोटी इतकी आहे. त्यातुलनेत प्रत्यक्ष मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या ५७० कोटींपर्यंत असली तरी सक्रीय मोबाईल क्रमांक तब्बल १,२१७ कोटींपुढे आहेत. म्हणजे जगात अनेकांकडे एकापेक्षा अधिक मोबाईल क्रमांक असल्याचे स्पष्ट होते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, की कित्येक लोकांचे एका मोबाईलवर काम भागत नाही. काही जणांकडे तर दोन-तीन मोबाईल असतात. त्यातही आता शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनाही डिजिटल लर्निंगच्या नावाखाली स्वतःचा मोबाईल हवा असतो. काही शाळा त्यासाठी आग्रहीदेखील असतात. परंतु लहान मुलांमधील मोबाईलचा वाढता वापर धोकादायक असल्याची सर्वत्र जाणीव असली तरी अनेक घरांमध्ये लहानगे शांत राहावे, त्यांनी गपगुमान जेवण करावे, म्हणून लगेच त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो. फार कमी पालकांकडून मुलांना मोबाईल न दाखवण्याबाबत प्रयत्न केले जातात, मात्र ते प्रमाण अगदी नगण्य आहे.
लहान मुलांमधील मोबाईलच्या वाढत्या वापराबाबत आजवर अनेकांनी चिंता व्यक्त केली, मात्र नुकत्याच जर्नल ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट अँड कॅपॅबिलिटीजमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार वयाच्या १२ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात मोबाईल वापरणाऱ्या मुलांना प्रौढावस्थेत गेल्यावर मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता अधिक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. जगभरातील जवळपास एक लाखाहून तरुणांवर केलेल्या अभ्यासातून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत.