
जगात सर्वात वेगवान बदल घडताहेत ते तंत्रज्ञान क्षेत्रात. अगदी महिना, वर्षभरापूर्वी सुरू आलेले तंत्रज्ञान आज ‘आउटडेटेड’ ठरण्याची शक्यता असते. नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान, लोकांनी स्वीकारलेला बदल, माहितीचे नवनवे उपलब्ध होणारे स्रोत, बाजारात आलेल्या नव्या स्पर्धकांमुळे आतापर्यंत ‘बाप’ असलेल्या कंपन्यांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे फेसबुक (मेटा) आणि गुगल. सर्च इंजिनच्या क्षेत्रात गुगल आणि समाजमाध्यमांच्या क्षेत्रात फेसबुक, या मागील कित्येक वर्षांपासून अधिराज्य गाजवणाऱ्या कंपन्यांना आता मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अलीकडच्या काळात युवावर्गाकडून फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित झाल्यापासून चॅटजीपीटीसारख्या चॅटबोट सेवांमुळे माहितीच्या शोधासाठी गुगलची मदत घेण्याचे प्रमाणही घटले आहे.
मागील २० वर्षांपासून तंत्रविश्वात हुकूमत गाजवणाऱ्या गुगलचा सर्च इंजिन म्हणून बाजारात अजूनही ९० टक्के वाटा आहे. जगाच्या पाठीवरील नव्हे, तर अखंड विश्वातील कोणतीही माहिती हवी असल्यास आपल्यापैकी सर्वच गुगलची मदत घेतात. २१व्या शतकाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ७ सप्टेंबर १९९८ रोजी लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी गुगलची स्थापना केली. स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रोजेक्ट म्हणून गुगल हे सर्च इंजिन विकसित केले होते. टप्प्याटप्प्याने तांत्रिक सुधारणा करीत गुगलने स्वतःचे अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. २००४ मध्ये ई-मेल सुविधा उपलब्ध केल्यानंतर एवढ्यावरच मर्यादित न राहता, विविध कंपन्या अधिग्रहित करीत गुगलने तंत्रविश्वात आपला विस्तार करण्यास सुरुवात केली.