

Google Gemini AI Revolution
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
‘जेमिनी १.०’ चॅटबॉट जगासमोर आला, तेव्हा तो केवळ दुसऱ्या चॅटबॉट्सची नक्कल नव्हता; तर तो सुरुवातीपासूनच ‘नेटिव्हली मल्टीमोडल’ बनवला गेला होता. जेमिनीनं आपल्या ‘कॉन्टेक्स्ट विंडो’ म्हणजेच मेमरीचा प्रचंड विस्तार केला, ज्यामुळे तासन्तासांचे व्हिडिओज, हजारो पानांची पुस्तकं किंवा संपूर्ण सॉफ्टवेअर कोड यांचं एकाच वेळी विश्लेषण करणं जेमिनीला सहज शक्य झालं.
तीस नोव्हेंबर २०२२ हा एक ऐतिहासिक दिवस होता. त्या दिवशी ‘ओपनएआय’ नावाच्या एका लहानशा कंपनीनं ‘चॅटजीपीटी’ नावाचा एआय चॅटबॉट लोकांसाठी खुला केला. सुरुवातीला हा संगणक क्षेत्रातला आणखी एक छोटा प्रयोग आहे असं अनेकांना वाटलं; पण काहीच दिवसांत या सिस्टिमनं संपूर्ण जगाला थक्क केलं. कॉम्प्युटर आता माणसासारख्या सुंदर कविता लिहू लागला होता, कोडिंग करत होता आणि माणसाच्या रोजच्या कामात थेट मदत करत होता.
गेली पंचवीस वर्षे इंटरनेटवर एकाधिकारशाही गाजवणाऱ्या ‘गुगल’ या महाकाय कंपनीसाठी ही घटना एका मोठ्या भूकंपासारखी होती. जर लोकांनी माहिती शोधण्यासाठी गुगलवर जाऊन निरनिराळ्या लिंक्स उघडण्याऐवजी थेट एआयलाच उत्तर विचारायला सुरुवात केली, तर गुगलच्या सर्च बिझनेसचं आणि त्यावर आधारित अब्जावधी डॉलरच्या ॲड्सच्या कमाईचं काय होणार? या एकाच प्रश्नानं गुगलचं मुख्यालय हादरलं आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी तातडीनं कंपनीत ‘कोड रेड’ म्हणजेच चक्क आणीबाणी घोषित केली!