
कुसुम बाळसराफ, माजी महाव्यवस्थापक, माविम
बचत गट हे केवळ ‘दारिद्र्य निर्मूलनाचे’ साधन नसून ते ‘महिला सक्षमीकरणाचे’ प्रभावी साधन म्हणून दृश्य स्वरूपात दिसू लागले आहे. तीन दशकांमध्ये देशभरात बचत गटांचे जाळे निर्माण झाले आहे. ही चळवळ प्रगल्भतेच्या एका टप्प्यावर असून, त्यांच्या व्यवसायांचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार आणि बँकांना त्यांच्या धोरणांमध्ये बदल करण्याची गरज दिसून येत आहे.
गरीब लोक सावकारीच्या पाशात अडकल्यामुळे गरिबीचे दुष्टचक्र अगदी भीषण होत जाते. या दुष्टचक्रातून गरिबांना बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असते. या दृष्टीने नियोजन आयोग, ग्रामविकास आणि शहर विकास विभागांमार्फत दारिद्र्य निर्मूलनासाठी एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (आयआरडीपी), महिला समविकास योजना, द्वाक्रा अशा अनेकविध योजनांची आखणी प्रत्येक पंचवार्षिक योजनेत केली जात होती.