
सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
अमेरिकेत खेळाची दुनिया प्रचंड मोठी आहे. त्याचे अर्थकारण अतिप्रचंड मोठे आहे. मोठ्या आणि मध्यम आकाराच्या बऱ्याच कंपन्या खेळाला प्रोत्साहन देताना चांगल्या रकमेचे प्रायोजकत्व देतात. एकंदरच खेळाडू असो वा प्रेक्षक वा प्रायोजक सगळ्यांचे खेळावर नुसते लक्ष नसते तर प्रेम आहे.
बरेच दिवस डोक्यात अमेरिकेला सविस्तर दौरा करायचा विचार घोळत होता. संधी समोरून आली. मग काय बॅग भरली आणि अमेरिकेला धडक मारली. आठ शहरे आणि दोन भन्नाट जागांची भटकंती करायची योजना आखली होती. निसर्गाचा आस्वाद घेताना जुन्या मित्रांना भेटणे आणि अर्थातच अमेरिकेत खेळाच्या दुनियेत काय चालू आहे, याचा अंदाज घ्यायचा असा विचार घोळत होता. स्थानिक मित्रांनी मला पहिल्याच काही दिवसात मस्त फिरवले, ज्यात भन्नाट निसर्ग सफर झाली आणि वर खेळाच्या दुनियेतल्या मोजक्या परंतु रंजक घडामोडी समजल्या.