

Gut Microbiome
esakal
डॉ. दिलीप निकम - sakal.avtaran@gmail.com
पोटात जिवाणू आहेत म्हटल्यावर आपण म्हणतो, ‘काही औषध घेऊन त्यांना संपवायला हवे!’ पण थांबा! पोटातील प्रत्येक जिवाणू हा शत्रू नसतो. आपल्या आतड्यांमध्ये राहणारे जिवाणू, विषाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्मजीव यांच्या समुदायाला ‘गट मायक्रोबायोम’ म्हणतात... त्यामुळे पुढच्या वेळी जेवताना स्वतःला विचारा, ‘आज मी माझ्या चांगल्या सूक्ष्म मित्रांना काय खाऊ घातले?’
सकाळी उठल्यापासून आपण आपल्या शरीराची किती काळजी घेतो! वजनकाटा काय सांगतो, रक्तदाब किती आहे, साखर वाढली का, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत का, यावर आपले बारीक लक्ष असते; पण आपल्या शरीरात वावरणाऱ्या अब्जावधी सूक्ष्म पाहुण्यांची आपण साधी विचारपूसही करत नाही. उलट पोटात जिवाणू आहेत म्हटल्यावर आपली पहिली प्रतिक्रिया असते ‘काही औषध घेऊन त्यांना संपवायला हवे!’ पण थांबा! पोटातील प्रत्येक जिवाणू हा शत्रू नसतो. अनेक सूक्ष्म जीव तर आपल्या आरोग्याचे न बोलणारे सहकारी असतात. आपल्या आतड्यांमध्ये राहणारे जिवाणू, विषाणू, बुरशी आणि इतर सूक्ष्मजीव यांच्या समुदायाला ‘गट मायक्रोबायोम’ म्हणतात. हे सूक्ष्म जग केवळ अन्नपचनापुरते मर्यादित नसून प्रतिकारशक्ती, चयापचय क्रिया, वजन, दाह, मेंदूचे कार्य आणि काही आजारांच्या जोखमीशीही संबंधित आहे. म्हणूनच मायक्रोबायोमला आपल्या शरीरातील एक ‘अदृश्य अवयव’ म्हटले जाते.