
डोक्यावरचे काळेभोर, चमकदार, लांब केस हे सर्वांना आकर्षित करतात आणि व्यक्तिमत्त्व अधिक उठावदार करतात.
केसाचा गुंता फेकताय, थांबा!
डोक्यावरचे काळेभोर, चमकदार, लांब केस हे सर्वांना आकर्षित करतात आणि व्यक्तिमत्त्व अधिक उठावदार करतात. वयपरत्वे केसाच्या स्थितीत बदल होतात.केस गळणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे दररोज शंभर ते दीडशे केस गळत राहतात.याशिवाय काही जण नवस म्हणून केस कापतात तर काहींना आजारपणामुळे केस कापावे लागतात. घरात भांग पाडताना केस गळतात किंवा महिला वर्गांना देखील दररोज केसाचा गुंता काढावा लागतो. हा गुंता कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला जातो. परंतु हेच केस कोट्यवधी बाजाराचा भाग बनू शकतात, हे वाचून आश्चर्य वाटेल. केसांपासून विग किंवा एक्स्टेंशन तयार करणे हा आजचा मोठा उद्योग बनला असून तो अनेक देशांत पसरला आहे.
हेही वाचा: सोनेरी सरक्षित गुंतवणूक - गोल्ड सॉव्हरिन बाँड आणि गोल्ड इटीएफ
दक्षिणेतील सुपरस्टार अलू अर्जुनचा ’पुष्पा’ चित्रपट सध्या सुपर डुपर हीट ठरत आहे. आंध्र प्रदेशातील रक्तचंदनच्या तस्करीवर आधारलेला चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला आहे. लाखमोलाचे रक्तचंदन चीनमध्ये चोरट्या मार्गाने कसे जाते आणि त्यात कोण कोण सहभागी असते, हे दाखवण्यात आले आहे. दुर्मिळ वस्तूंची तस्करी नेहमीच केली जाते. यात आता मानवी केसांचा समावेश झाला आहे. चीनमध्ये आणि ईशान्य देशांत भारतीय केसांना प्रचंड मागणी असून या मागणीपोटीच केसांच्या तस्करीचा गोरखधंदा फोफावला आहे. तस्करीपर्यंत मजल मारणारा केसांचा व्यवसाय कधीपासून सुरू झाला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. पण स्मिथसोनियन मॅगझिनच्या एका अहवालानुसार १८४० च्या आसपास जगात केसांचा बाजार सुरू झाला असावा, अशी शक्यता वर्तविली आहे. प्रसिद्ध इंग्रजी लेखक अडॉल्फस ट्रालोप (Thomas adolphus trollope) यांनी फ्रान्सच्या ब्रिटनच्या वार्षिक जत्रांबाबत लिहले होते. त्यात म्हटले की, ‘‘जत्रेत मला सर्वात जास्त केसांच्या व्यापाऱ्यांनी हैराण केले. त्या गर्दीत केसांचे तीन चार खरेदीदार उभे होते. ते शेतकरी केस खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांना केस विकणाऱ्या मुलींना शोधताना फार त्रास झाला नाही. काही मुलींनी स्वत:हून केस कापून घेतले होते.’’
हेही वाचा: बर्फाचा पाऊस अनुभवायचायं? बॅग भरा अन् चला हिमालयाच्या शिखरांमध्ये
फ्रान्सच्या अनेक गावात आणि शहरात केस विकण्यासाठी लिलाव देखील व्हायचे. हार्पर्स बाजारने १८७३ मध्ये याचा उल्लेख केला आहे. यानुसार, बाजारात एक व्यासपीठ तयार केले होते. त्याठिकाणी मुली एकानंतर एक येतात आणि केसांचा लिलाव सुरू करतात. काही जण सिल्कचा रुमाल ऑफर करतो, कोणी पांढरा कपडा तर कोणी उंच टाचेच्या चपला. शेवटी सर्वाधिक बोली लावणाऱ्यास केस मिळायचे. ती मुलगी खुर्चीवर बसते आणि मग तिचे केस कापले जातात. कालांतराने हा व्यवसाय वाढत गेला आणि युरोपात केसांची गरज भासू लागली. त्यानंतर अनेक देशांतील मुलींनी केसांची विक्री सुरू केली. सद्यःस्थितीत आशिया खंडातील अनेक देश देखील व्यापारात सामील आहेत. यात भारताचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. परंतु जपानी मुलींच्या केसांसाठी जादा पैसे देऊनही त्याचा व्यापार केला जात नाही, हे विशेष.
भारतातील केसांचा बाजार
भारतात कोट्यवधींचा केसांचा बाजार आहे. हा व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू झालेला आहे. भारतीय महिलांच्या केसांना यापूर्वी देखील मागणी होती. आजही भारतीय महिलांच्या लांब केसांना सर्वाधिक पसंती दिली गेली आहे. त्यामुळे किंमतही अधिक मिळत असत. भारतातून चीन, मलेशिया, थायलंड, बांगलादेश, श्रीलंका, मालदिव, म्यानमार आदी ठिकाणी केसांची निर्यात केली जाते. भारतात मंदिरात दान केलेल्या केसांची देखील विक्री केली जाते. मंदिरापासून केसांची उपलब्धता अधिक राहिलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार, भारतातून दरवर्षी ४०० दशलक्ष डॉलरच्या केसांची निर्यात होते. मानवी केसांचा बाजार हा जगभरात सुमारे वार्षिक २२,५०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या बाजारात दरवर्षी दहा टक्के वाढ होत आहे. कोलकता, चेन्नई आणि आंध्र प्रदेश हे केस व्यवसायांचे बालेकिल्ला मानले जातात. विशेषत: ९० टक्के केस चीनला निर्यात केले जातात.
हेही वाचा: मातृत्वाला तिसरा पर्याय; आईनेच दिले लेकीला गर्भाशय
केसांचे काय केले जाते
भारतातील मंदिरातून केसांची खरेदी करून म्यानमार आणि बांगलादेशात त्यावर प्रक्रिया केली जाते. बांगलादेशात मजुरीचा दर कमी असल्याने केसांवर प्रक्रिया करणे सोयीचे आणि फायद्याचे मानले जाते. त्यानंतर चीनमध्ये केसांची निर्यात केली जाते. कारखान्यात सर्वप्रथम केसांचा गुंता काढला जातो. त्यानंतर त्याचे बंडल तयार केले जाते. केस धुतले जातात आणि ते वाळवले जातात. हे बंडल परदेशात निर्यात केले जातात. परदेशात नैसर्गिक केसांचा मोठा बाजार आहे आणि त्यापासून विग तयार केला जातो. हा विग अनेक श्रीमंत लोक जादा पैसे देऊन खरेदी केली जातात. त्यामुळे बाजाराची उलाढाल वाढलेली दिसून येते. प्रामुख्याने चीनमध्ये या केसांपासून ह्यूमन विग आणि सौंदर्य उत्पादने तयार केली जातात. याशिवाय म्यानमारहून थायलंडला केसांची निर्यात केली जाते. दी लल्लनटॉपच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईत मानवी केसांचे बरेच कारखाने आहेत. स्थानिक कारखानदार ए.एल. किशोर यांच्या माहितीनुसार, त्यांचे आजोबा, पणजोबा या व्यवसायात होते. स्वातंत्र्यापूर्वी त्यांच्या पणजोबांची इंग्रज लोकांबरोबर चांगली मैत्री होती. त्यांनी एकदा ब्रिटिश न्यायधीशांसाठी पांढऱ्या केसाचा विगची मागणी केली. तेव्हा पणजोबांनी केसाचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी मंदिरात दान केलेले केस गोळा केले. त्यांना स्वच्छ केले आणि न्यायाधीशांसाठी पांढरा विग तयार केला. त्यानंतर हाच पुढे व्यवसाय बनला. केस तीन मार्गाने गोळा केले जातात. डोअर टू डोअर, सलून आणि मंदिर.
केसांचा दर
केसांचा दराचा विचार केल्यास त्याचा आकार आणि दर्जा यावर केसांची किंमत अवलंबून आहे. नॉन केमिकल केसाला अधिक भाव आहे. यात सरासरी ७ ते ८ हजार रुपये प्रति किलो दराने विक्री केली जाते. परंतु लांब केसांची किंमत ही २५ हजार रुपये प्रतिकिलो किंमतीने विक्री केली जाते. अन्य तज्ञांच्या मते, काही ठिकाणी केसांची किंमत २७ रुपयांपासून ते १४०० रुपये प्रतिकिलो आहे. साधारणपणे मानवी केसांची खुल्या बाजारात ४५०० ते ६००० रुपये प्रतिकिलो विक्री केली जाते. २०१७ पासून त्याच्या सरासरी किंमतीत घसरण होत आहे. देशात यास चुट्टी, गोली आणि थुट्टी या नावाने देखील ओळखले जाते. किंमत कमी होण्यामागे प्रमुख कारण म्हणजे चीनमध्ये गैरमार्गाने होणारी केसांची निर्यात. या बेकायदा तस्करीमुळे भारताला दरवर्षी सुमारे दीडशे कोटी रुपयांचा फटका बसत आहे. केसांची वाढती तस्करी पाहता पश्चिम बंगालचे विशेष पथक तसेच जीएसटी, कस्टम्स, डीआरआय, विमानतळ प्राधिकरण सतत सजग असते. अधिकाऱ्यांच्या मते, कर वाचवण्यासाठी मानवी केसांच्या किमती जाणीवपूर्वक किमती कमी दाखविली जाते. वास्तविक विग आणि एक्स्टेशन्सची मागणी वाढत असल्याने मानवी केसांना ४० टक्क्यांपर्यंत मागणी वाढली आहे. मानवी केसांचा व्यवसाय वाढीमागे फॅशन इंडस्ट्री आणि उच्चभ्रू वर्गातील श्रीमंत लोक कारणीभूत आहेत. कारण या वर्गात विग आणि हेअर एक्स्टेंशन बऱ्याच प्रमाणात प्रसिद्ध आहेत. नेल्सन कंपनीच्या मते हा व्यवसाय दरवर्षी दहा टक्क्याने वाढत चालला आहे. २०२३ पर्यंत हा व्यवसाय ७५ हजार कोटींपर्यंत पोचेल, असा अंदाज आहे. २०१८ मध्ये एकट्या भारतात अडीचशे कोटी केसांनी व्यवसाय केला. ही उलाढाल जगातील एकूण उलाढालीच्या निम्मी आहे.
हेही वाचा: मातृत्वाला तिसरा पर्याय; आईनेच दिले लेकीला गर्भाशय
तस्करीचा धोका
भारतात केसांची खरेदी स्थानिक भाविकांशिवाय आंध्र प्रदेश, तेलंगण येथील मंदिर आणि चर्च येथील प्रशासनाशी चर्चा करून लिलावाच्या माध्यमातून खरेदी केली जाते. त्यानंतर हे केस सिंकदराबादहून कोलकता किंवा गुवाहाटी या रेल्वे मार्गाने रवाना केल्यानंतर पुढील टप्प्यांत रस्ते मार्गाने म्यामनारला पाठवण्यात येतात.पण म्यानमार सीमेवर रस्ते मार्गाने अनेक प्रकारची तस्करी होते. काही दिवसांपूर्वी केसांची बेकायदा तस्करी देखील पकडण्यात आली होती. दक्षिणेतील एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार चेन्नई आणि काही गावात डोअर टू डोअर केस गोळा करणाऱ्या महिला असून त्या वजनाच्या हिशोबानुसार पैसे देतात. एका ग्रॅमला एक रुपये. जर एखादी महिला ५० ग्रॅम केस देत असेल तर तिला ५० रुपये दिले जातात. या केसांना ‘नॉन रेमी हेअर’ किंवा ‘कॉम्ब वेस्ट’ असे म्हटले जाते. हेच केस पुढे जाऊन एका मोठ्या व्यवसायाचा भाग बनतात. कटिंगच्या दुकानात, सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये किंवा मंदिरात केस दान करतो, तेव्हा ते केस फेकून दिले जात नाहीत. ते विग किंवा एक्स्टेंशन (नैसर्गिक केसांना दाट करणे) करणाऱ्या कंपन्यांना विकले जातात.
केस निर्यातीतील काही देशांचा वाटा (२०१९)
- भारत : २५० कोटी रुपये
- हॉंगकॉंग: १२७ कोटी रुपये
- म्यानमार: ६३ कोटी रुपये
- ब्रिटन: २१ कोटी रुपये
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”