

Health Emergency
esakal
प्रताप पवार - saptrang@esakal.com
आयुष्यात काही प्रसंगांचा आपल्याला कधीच विसर पडत नाही. मात्र जिव्हाळ्याच्या व्यक्तींच्या सहवासाने अशा प्रसंगांतून आपण सहजतेने बाहेर पडतो. खरोखरच त्यातून काळाचा महिमा आपल्या ध्यानात येतो.
या अनुभवाची सुरुवात रविवारी म्हणजे १ नोव्हेंबरला झाली. जवळच्या मित्राने आग्रहाने दुपारी जेवणाचे आमंत्रण दिले होते. अर्थात, अशा वेळी आणखी २-४ जोडपी येणार हे गृहित असते. आमचा वेळ छान गेला. गप्पा, चेष्टा वगैरेंमध्ये वेळ कसा गेला ते समजले नाही. तृप्त मनाने दुपारी अडीचच्या सुमाराला आम्ही सर्व बाहेर पडलो. निघताना मित्राच्या मुलीने माझ्याकडे पाहात उद्गार काढले, ‘काका तुम्ही १० वर्षांनी तरुण दिसताय!’ कोणाला असा शेरा आवडणार नाही? मी तिचे कौतुकास्पद आभार मानून मोटारीत बसलो. सायंकाळ छान गेली.
सोमवार ते गुरुवार माझे कार्यक्रम सुरूच होते. परंतु थकवा वाढत चालला होता. थोडे चालले तरी दम लागत होता. आमच्याकडे आजी आणि वडील यांना दमा होता. दोघांचेही निधन त्यामुळे झाले. यामुळे मला दम्याबद्दल शंका आली. मी माझ्या डॉक्टरांना भेटलो. त्यांनी तपासणी केल्यावर ‘सर्व काही ठीक आहे. कोणत्याही औषधाची गरज नाही,’ असे सांगितले. हे सर्व ५ नोव्हेंबरला म्हणजे वसुबारसेच्या दिवशी झाले. दिवाळीच्या शुभेच्छा यायला सुरवात झाली होती. त्या दिवशी संध्याकाळी सुद्धा माझी एक मीटिंग झाली. दुपारी थोडी झोप काढली होती. सायंकाळ नातवंडे, मृणाल, अभिजित, अश्विनी बरोबर छान गेली.