

Himalayan glaciers melting
esakal
हिमालयातील हिमनद्या लुप्त पावत आहेत व त्याचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होणार आहे. आज सरकारी पातळीवर नद्या बचाव व सुधार योजना चालू आहेत. नद्या वाचवणं, जगवणं, वाढवणं गांभीर्याने घेतलं जातंय. असंच हिमनद्यांच्या बाबतीतदेखील केलं पाहिजे. अनेक वैज्ञानिक संस्था यावर काम करीत आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.
पर्वत म्हणजे फक्त उंच कडे, खडक आणि धुक्यात हरवलेले आकार नव्हेत. माझ्यासारख्या पन्नास वर्षांहून अधिक काळ हिमालयाच्या सान्निध्यात राहिलेल्या गिर्यारोहकाला पर्वत म्हणजे जिवंत पुस्तक वाटतं, ज्याच्या प्रत्येक पानावर निसर्गाचं ज्ञान, सौंदर्य आणि विनम्रता कोरलेली असते. या पर्वतराज्यातील सर्वांत शांत पण सर्वांत प्रभावशाली पात्र म्हणजे हिमनदी. दिसायला स्थिर, वरून थंड, थिजलेली पण आतमध्ये अगदी सावकाश, तरीही सतत वाहणारी; हजारो वर्षांचा इतिहास घेऊन धावणारी आणि मानवजातीच्या पाण्याची, अन्नाची आणि जीवनाची सर्वात महत्त्वाची शिरा.