
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
खूप हिंदी भाषिक लोक अशा भ्रमात आहेत, की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. अजूनही अनेकांचा हा भ्रमाचा भोपळा फुटलेला नाही. हिंदीसक्ती हा विषय जुना आहे. तो अध्यादेश काढून पूर्ण होणार नाही. चोरून लपून कायदे करून जमणार नाही. लोकांना ती भाषा शिकावी वाटली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
आमचा एक हिंदी मित्र म्हणाला, की तुमच्या मराठी भाषेत जो ‘ळ’ तो मला बोलता येत नाही, म्हणून मी मराठी बोलत नाही. त्यावर मराठी मित्र म्हणाला, तुमच्या हिंदीत ‘ळ’ नाही म्हणून आम्हाला तिची सक्ती नको. ‘नाही’ म्हणायला ‘ळ’सुद्धा पुरतं. ‘नाहीच’ म्हणायचं असतं; पण ‘हो’ म्हणायला खूप कारणं लागतात. हिंदी सक्तीपेक्षा हिंदी प्रेमाने का स्वीकारली जात नाही याला काही कारण असेलच ना? आता हेच बघा. मराठी माणूस इतर प्रदेशात शिकायला गेला किंवा कामाला गेला तर त्याने तिथली भाषा शिकली पाहिजे. कारण स्थानिक भाषा नेहमीच माणसं जोडायला, व्यवहाराला आणि गोष्टी नीट समजून घ्यायला कामी येते. या गोष्टीला कुठल्या मराठी माणसाचा विरोध नसतो. मग हिंदी जनतेला मराठी शिकण्याची अडचण का असावी? पहिली अडचण, आपण बहुसंख्य आहोत या गोष्टीची.