
डॉ. सदानंद मोरे
इंग्लंडचे साम्राज्य जगभर पसरले असले आणि त्यात भारताचाही समावेश होत असला, तरी नाट्यपूर्ण घटना-घडामोडींनी भरलेला व भारलेला प्रदेश आफ्रिकेचाच होता. साहजिकच तो नवनव्या कल्पनांना जन्म देणारा प्रदेशही ठरला. महात्मा गांधींना सत्याग्रहाची कल्पना तेथेच स्फुरली व तेथेच साकार झाली हा काही योगायोग नव्हे. चर्चिलच्या विचारसरणीची प्रारंभिक जडणघडणही तेथेच झाली. युद्ध हा काय प्रकार असतो हेही त्याला तेथे समजले.
अलेक्झांडरपासून नेपोलियनपर्यंतच्या अनेक सम्राटांनी युद्ध करून जगज्जेता होण्याचा घाट घातला होता. जग जिंकून त्यावर आपला एकछत्री अंमल स्थापायचा तो कशासाठी, याचे एक सरळ आणि स्पष्ट उत्तर म्हणजे संबंधित सत्ताधीशाच्या सत्ताकांक्षेसाठी सुरुवातीच्या काळात सर्वांनीच हा प्रकार स्वाभाविक असल्याचे मान्य केले होते.