

Honey Bee Network Innovation
esakal
डॉ. अनिल गुप्ता
देश, परदेशातील लोकांशी संवाद साधताना मी कायम सांगतो, की शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थांवर लक्ष केंद्रित करा. त्यांच्याकडे विविध संकल्पना असतात, या संकल्पनांवर काम करणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही ग्रामीण संशोधकांची माहिती पुस्तके, वेबसाइटच्या च्या माध्यमातून लोकांपर्यंत आणली. प्रत्येक राज्यातील शिक्षणमंत्र्यांना माझी विनंती आहे, की त्यांनी या ग्रामीण संशोधकांबद्दलची माहिती शैक्षणिक पाठ्यपुस्तकांमध्ये धड्यांच्या स्वरूपात द्यावी.
सामान्य लोक त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या दैनंदिन समस्यांवर मात करण्यासाठी आहे त्या परिस्थितीत काही ना काही उपाय शोधत असतात. हा एक संशोधनाचा महत्त्वाचा टप्पा आहे, कारण त्यांच्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी कोणते विद्यापीठ किंवा संशोधक त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसते. काहीजण उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात, काहीजण इतरांना येणाऱ्या समस्यांवर खात्रीशीर उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील असतात, तर काहीजण अशा विचारांवर काम करतात, की भविष्यात कोणत्या समस्या येऊ शकतात आणि त्यावर मात करण्यासाठी आधीच उपाय शोधण्यास सुरुवात करतात. या प्रकारचे लोक तसे कमी दिसून येतात. पण या सर्वांच्या प्रयत्नांची दखल आम्ही ‘हनी बी नेटवर्क’ आणि राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान (नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन) यांच्या माध्यमातून घेण्यास सुरुवात केली.
ही सुरुवात करण्यामागेदेखील एक वेगळीच गोष्ट आहे. अहमदाबादमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) कॅम्पसमधून घरी जात असताना मला विविधरंगी फुलझाडांच्या ताटव्यावर मधमाश्या परागकण गोळा करताना दिसल्या. हे परागकण घेतल्यामुळे फुलांना दुःख होत नाही, उलट पुढील फळधारणेसाठीचा त्यांना आनंदच होत असतो. म्हणूनच विविधरंगी फुले मधमाश्यांना सातत्याने आकर्षित करत असतात. या मधमाश्यांच्या कार्यपद्धतीमधून मला हनी बी नेटवर्क संकल्पना सुचली. ग्रामीण भागातील लोकांनी त्यांच्या समस्येवर शोधलेले उपाय, केलेले संशोधन, विकसित केलेली अवजारे, प्रक्रियेच्या नव्या पद्धतीची माहिती, हे सगळे गोळा करून एका ठिकाणी मधाप्रमाणे संकलित करण्यास सुरुवात केली. आपल्या आरोग्याच्या गरजेनुसार आपण मध खातो, त्याच पद्धतीने त्यांच्या गरजेनुसार ही माहिती लोकांनी वापरावी आणि आलेल्या समस्येवर मात करावी. तसेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेली वेगळी माहिती यामध्ये जमा करावी. ज्ञानाच्या संवर्धनासाठी हनी बी नेटवर्कची सुरुवात झाली. याचबरोबरीने आम्ही ‘सृष्टी’ (एसआरआयएसटीआय - सोसायटी फॉर रिसर्च ॲण्ड इनिशिएटिव्ह फॉर सस्टेनेबल टेक्नोलॉजिज ॲण्ड इन्स्टिट्युशन्स), ‘ग्यान’ (जीआयएएन - गुजरात ग्रासरूट्स इनोव्हेशन ऑगमेंटेशन नेटवर्क) आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनची (एनआयएफ - नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन) स्थापना केली. आम्ही हनी बी नेटवर्कच्या माध्यमातून देश आणि परदेशातील ग्रामीण भागातील लोकांनी केलेले संशोधन, उपाययोजनांचे संकलन करून जगाच्या समोर मांडले. त्याचा जगभरातील लोकांना फायदा होताना दिसत आहे.