esakal | आफ्रिकेतील संघर्षाची ‘गुप्ता’गिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Gupta Brothers}

आफ्रिकेतील संघर्षाची ‘गुप्ता’गिरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सामान्य आफ्रिकन नागरिक देशाच्या सध्याच्या आर्थिक संकटासाठी गुप्ता बंधूंना दोषी ठरवत आहेत. त्यांच्या मनातील राग पिढ्यान्‌पिढ्या आफ्रिकेत वसलेल्या भारतीयांवर निघत आहे. १९९० मध्ये उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथून गुप्ता बंधू दक्षिण आफ्रिकेत व्यवसायासाठी गेले. काही काळातच सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बस्तान बसवले. भ्रष्टाचार, लाचखोरीच्या माध्यमातून अल्पावधीत गुप्ता बंधूंनी आपले साम्राज्य उभे केले.

जगाला दिशा दाखवणारा नेल्सन मंडेलांचा दक्षिण आफ्रिका पुन्हा अस्वस्थतेच्या फेऱ्यात सापडला आहे. अर्थव्यवस्था ढासळली. लुटालुटीचं सत्र सुरू झालंय. हिंसाचाराचा आगडोंब उसळला. यावेळी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाचे लोक दंगलखोरांच्या टार्गेटवर आहेत. त्याला कारणीभूत आहेत गुप्ता बंधू आणि त्यांनी उभं केलेलं अनैतिक साम्राज्य.
शेकडो वर्षांपूर्वी मजूर म्हणून आफ्रिकेत गेलेल्या भारतीयांनी मोठ्या मेहनतीने, सचोटीने आणि संघर्षाने आफ्रिकन समाजात एक महत्त्वाचे स्थान मिळवले.

ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेविरुद्धच्या आफ्रिकन स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र गुप्ता बंधूंच्या कारनाम्यामुळे त्या सर्व मेहनतीवर पाणी ओतले गेले आहे. भ्रष्टाचार, लाचखोरीच्या माध्यमातून गुप्ता बंधूंनी आपले साम्राज्य उभारले खरे. मात्र ते आता तिथल्या भारतीयांच्या मुळावर उठले आहे. आफ्रिकेत सध्या भडकलेल्या हिंसाचाराचे मूळ कारण दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जेकब झुमा यांच्या नऊ वर्षांच्या भ्रष्टाचाराच्या कारकिर्दीत सामावले आहे. एकेकाळी दक्षिण आफ्रिकेची अर्थव्यवस्था जगात भक्कम समजली जात होती. त्याच देशात कोट्यवधी नागरिक पुन्हा भीषण दारिद्र्याच्या खाईत ढकलले गेलेत. सध्या सुरू असलेल्या हिंसाचारामागे कुठलेही वांशिक, कुठलेही राजकारण नाही; तर अर्थव्यवस्थेच्या अपयशाची किनार आहे. हिंसाचारात आतापर्यंत ७० जण ठार झालेत, तर अनेक जण जखमी झालेत. अर्थव्यवस्थेचे किती नुकसान झाले याची अजून मोजदाद नाही. यावेळी दंगलखोरांच्या टार्गेटवर भारतीय वंशाचे नागरिक आहेत. दंगलखोरांनी भारतीयांची दुकाने आणि घरे लुटली.

अर्थव्यवस्था कोसळली...

२०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर सात टक्क्यांनी कमी झाला आहे. १९४६ पासून पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेने एवढा तळ गाठला आहे. महत्त्वाचे म्हणजे कोविड लाट, लॉकडाऊन होण्यापूर्वीच अर्थव्यवस्था कमजोर झाली होती. सध्या कोसळलेली अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे.
शासकीय आकडे, सध्याच्या द. आफ्रिकेचे भीषण चित्र सांगतात. २०२१ या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत बेरोजगारीचा दर ३३.६ टक्क्यांवर पोहोचला. ‘वॉल स्ट्रिट जर्नल’ या जगविख्यात वर्तमानपत्राने मार्च आणि एप्रिलदरम्यान एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये देशाच्या लोकसंख्येचा सहावा भाग म्हणजे एक कोटीपेक्षा जास्त लोक महिन्यातून सात दिवस उपाशी राहतात.

बहुतांश अर्थशास्त्रज्ञ दक्षिण आफ्रिकेच्या सध्याच्या परिस्थितीसाठी माजी अध्यक्ष जेकब झुमा यांना जबाबदार ठरवतात. जेकब झुमा हे २००९ ते २०१८ म्हणजे नऊ वर्षे अध्यक्षपदावर होते. त्यांच्या काळात भ्रष्टाचार माजला. निवडक आणि प्रभावी उद्योगपतींनी सरकारवर ताबा मिळवला होता. अर्थशास्त्रात याला ‘स्टेट कॅप्चर’ असं म्हणतात. सर्वत्र माजलेल्या भ्रष्टाचार आणि लाचखोरीमुळे दक्षिण आफ्रिकेची अर्थव्यवस्था झपाट्याने खाली आली. जेकब झुमा यांच्या कारकीर्दीत त्यांचे नातेवाईक आणि सत्ताधारी पक्षातील विश्वासू पदाधिकाऱ्यांनी खोऱ्याने पैसा कमावला. मात्र सामान्य आफ्रिकन नागरिक दारिद्र्यात खितपत पडले होते.

गुप्ता बंधू....

सरकारला वेठीस धरणाऱ्या या उद्योगपतींपैकी सर्वात मोठे नाव होते गुप्ता बंधू. १९९० मध्ये उत्तर प्रदेशच्या सहारनपूर इथं राहणारे गुप्ता बंधू दक्षिण आफ्रिकेत व्यवसायासाठी आले. काही काळातच सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बस्तान बसवलं. भ्रष्टाचार, लाचखोरीच्या माध्यमातून अल्पावधीत गुप्ता बंधूंनी आपले साम्राज्य उभे केले. गुप्ता बंधू म्हणजे अजय, अतुल आणि राजेश गुप्ता. जेकब झुमा यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी शासकीय धोरण स्वत:च्या फायद्यासाठी वाकवले. या तीन भावांनी जवळपास सरकार ताब्यात घेतले म्हणजे ‘स्टेट कॅप्चर’ केले.

गुप्ता बंधूंचा झुमा सरकारवर एवढा प्रभाव होता, की ते स्वत: शासकीय धोरणे तयार करायचे आणि संबंधित मंत्र्यांना ती मंजूर करायला भाग पाडायचे. जर एखाद्या मंत्र्याने तसे करण्यास नकार दिला तर त्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्याची धमकी देण्याइतपत गुप्ता बंधूंची मजल गेली होती. संपूर्ण जेकब झुमा सरकार गुप्ता बंधूंच्या एवढे अधीन गेले होते की, मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचे हेदेखील गुप्ता बंधू ठरवत. दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांत गुप्ता बंधूंनी हातपाय पसरले. खनिज, ऊर्जा, दूग्ध उत्पादन ते नागरी उड्डयण या क्षेत्रांतही त्यांनी आपले बस्तान बसवले. या काळात गुप्ता भावंडांनी खोऱ्याने पैसे कमावले. २०१३ ते २०२० या काळात त्यांनी जवळपास ४६०० कोटी रुपये दक्षिण आफ्रिकेबाहेर वळवले. चीन आणि हाँगकाँगस्थित बेकायदेशीर शेल कंपन्यांमार्फत ते पैसे दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पाठवले गेले. जेकब झुमा यांच्या काळात कमावलेले पैसे कदाचित याहीपेक्षा जास्त असू शकतात, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गुप्ता बंधूंच्या या भ्रष्टाचाराला तिथल्या प्रसारमाध्यमांनी वाचा फोडली. त्यातून गुप्ता बंधूंनी देशाची कशी लूट केली, हे सामान्य आफ्रिकन नागरिकांच्या लक्षात आले. गुप्ता बंधूंच्या भ्रष्टाचार, लाचखोरीच्या चौकशीसाठी दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्य सरन्यायाधीश रोनाल्ड झोंडो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. याला झोंडो कमिशन म्हटले जाते.
चौकशी समिती आणि इतर संस्थांचा चौकशीचा ससेमिरा सुरू झाल्यावर २०१८ मध्ये गुप्ता बंधूंनी दक्षिण आफ्रिकेतून पळ काढला. दक्षिण आफ्रिकन न्यायालय आणि झोंडो समितीपुढे हजर होण्यासही त्यांनी नकार दिला. त्यांनी संपूर्ण व्यवसाय संयुक्त अरब अमिरात या देशात हलवला आणि ते सध्या दुबईत राहतात. तिथूनच व्यवसाय चालवतात. भारतात त्यांचे नेहमी जाणे-येणे असते.

२०१८ मध्ये अमेरिकीन ट्रेजरी विभागाने गुप्ता बंधूंचे खाते गोठवले आहे. गुप्ता बंधूंविरोधात दक्षिण आफ्रिकन न्यायालयाने इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. या चौकशीच्या फेऱ्यात जेकब झुमा हेदेखील सापडले. झोंडो कमिशनने त्यांना अनेकदा हजर राहण्यासाठी समन्स बजावले. या समितीपुढे झुमा कधीच हजर झाले नाहीत. शेवटी न्यायालयाच्या अवमानाच्या गुन्ह्यात झुमा यांना १५ महिन्यांची शिक्षा झाली आहे. झुमा तुरुंगात गेल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर देशात सर्वत्र हिंसाचार भडकला आहे.

जेकब झुमा यांना अटक झाल्यानंतर उफाळलेल्या हिंसाचाराच्या मागे सर्वात मोठे कारण अपयशी ठरलेली अर्थव्यवस्था हे आहे. वाढलेली बेरोजगारी, घटलेले उत्पन्न यामुळे पिचलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. या दंगलीत भारतीय आणि गोऱ्या लोकांच्या व्यवसाय, उद्योगधंद्यांना लक्ष्य केले गेले आहे. लूटमार थांबवण्यासाठी सरकार लष्करी बळाचा वापर करत आहे. मात्र त्यामुळे दबलेला वांशिक हिंसाचार अधिक उफाळू शकतो. गुप्ता बंधूंच्या भ्रष्टाचारामुळे, त्यांनी केलेल्या लुटीमुळे सामान्य आफ्रिकन जनतेच्या मनात भारतीयांबद्दल वाईट प्रतिमा तयार झाली आहे. अनेक दशकांपासून दक्षिण आफ्रिकेत वसलेल्या भारतीयांनी आपल्या मेहनतीने, कौशल्यामुळे, प्रामाणिकपणाच्या जोरावर समाजात स्थान निर्माण केले होते. गुप्ता बंधूंमुळे या प्रतिमेला कायमचे तडे गेले आहेत. देशाच्या सद्यस्थितीच्या आर्थिक संकटासाठी सामान्य जनता गुप्ता बंधूंना दोषी ठरवत आहे. त्यांच्या मनातील राग, खदखद ही पिढ्यान्‌पिढ्या आफ्रिकेत वसलेल्या भारतीयांवर निघत असल्याचे चित्र आहे. मात्र गुप्ता बंधू हे इतर दक्षिण आफ्रिकन वंशाच्या नागरिकांपेक्षा वेगळं प्रकरण आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

१०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी मजूर म्हणून भारतीयांना दक्षिण आफ्रिकेत आणले. अत्यंत प्रतिकूल हवामानात शेतमळ्यात मजूर म्हणून ते काम करायचे. त्यांना माणुसकीची वागणूक मिळत नव्हती. याच भारतीयांनी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले. ब्रिटिश सत्तेच्या दमणकारी वृत्तीविरुद्ध लढ्यात अनेक भारतीय मारले गेले, त्यांचा अतोनात छळ झाला. आफ्रिकन राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून ते ब्रिटिशांसोबतच्या लढ्यात भारतीयांनी आफ्रिकन श्वेत नागरिकांच्या खांद्याला खांदा लावून काम केले.

त्यामुळे दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाल्यानंतर भारतीयांना समाजात सन्मान मिळाला. अनेक भारतीय सरकारमध्ये मंत्री झालेत, तर अनेक जण अधिकारपदावर गेले. मात्र गुप्ता बंधूंमुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भारतीयांनी मिळवलेल्या सामाजिक स्थानावर आणि त्यांच्या संघर्षावर पाणी ओतले गेले. गुप्ता बंधूंविरोधात खदखदणारा राग तिथल्या भारतीयांवर वळला आहे. गुप्ता बंधूंनी संसाधन, नैसर्गिक खनिज संपत्तीवर डल्ला मारून ब्रिटिशांसारखे देशाचे शोषण केले. अब्जावधी रुपये दक्षिण आफ्रिकेबाहेर वळवले. या भ्रष्टाचारामुळे देशाची अर्थव्यवस्थेची गती मंदावली आहे, असा सर्वमान्य समज तिथल्या जनतेत आहे. तो बऱ्याच अंशी खरा आहे. भारतीयांविरोधातील धग कालांतराने कमी होईल. मात्र गुप्ता बंधूंनी जी हानी केली आहे, ती भरून निघायला बराच कालावधी जाणार आहे. ही खदखद, असंतोषाचा ज्वालामुखी केव्हा फुटेल याचा नेम नाही.

प्रपोगंडा चॅनेलची उभारणी

सर्वच उद्योगांत आपले पाय रोवल्यानंतर २०१३ मध्ये गुप्ता बंधूंनी न्यूज चॅनेल उभारायचे ठरवले. ‘एएनएन७’ या त्यांच्या चॅनेलच्या संपादकपदी माझी निवड झाली होती. जागतिक दर्जाचे चॅनेल उभारून देण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. मी आपली टीम घेऊन दक्षिण आफ्रिकेत गेलो. माझ्या टिममध्ये अनेक ज्येष्ठ पत्रकार होते. तिथे पोहोचल्यावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्यासोबत माझ्या चार बैठका झाल्या. या बैठकीत चॅनेलमध्ये कुठल्या आणि कुणाच्या बातम्या चालवायच्या हे झुमा आम्हाला सांगायचे. त्यावेळी हे चॅनेल शासकीय प्रपोगंडासाठी सुरू केल्याचे माझ्या लक्षात आले. या बैठकांत चॅनेलव्यतिरिक्त गुप्ता बंधूंच्या इतर व्यवसायाबद्दल चर्चा होत असे, त्यात कुठल्या मंत्र्याकडून कुठली कामे करून घ्यायची आहेत. हे ठरवले जायचे. या बैठका म्हणजे एक प्रकारे भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डाच होता. संपादक या नात्याने अनेक कागदपत्रांवर बेकायदेशीर सही करायला गुप्ता बंधू मला सांगायचे.

मी त्याला स्पष्टपणे नकार दिला. चॅनेल लाँच करणे माझे काम आहे, एकदा ते झाले की निघून जाईल, मात्र बेकायदेशीर काम मी करणार नाही, हे गुप्ता बंधूंना बजावले. माझा पगार दुप्पट करू, अशी त्यांनी ऑफर दिली. मी त्याला नकार दिला. मग त्यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. सरकार, पोलिस प्रशासन गुप्ता बंधूंच्या खिशात होते. तेव्हाचे भारतीय हाय कमिशनर हेदेखील गुप्ता बंधूंचे खासमखास होते. माझी चारही बाजूने कोंडी केली गेली. मला त्रास दिला गेला, पोलिस माझ्यावर पाळत ठेवायचे. मात्र मी कसा बसा दक्षिण आफ्रिकेबाहेर पडण्यात यशस्वी झालो. २०१३ मध्ये गुप्ता बंधूंच्या भ्रष्टाचारावर एक पुस्तक लिहिले. पुस्तकाचे प्रकाशन थांबवण्यासाठी माझ्या प्रकाशकाला दबाव टाकला गेला. खोटेनाटे गुन्हे दाखल केले. त्यामुळे जवळपास पाच वर्षे पुस्तक प्रकाशित होऊ शकले नाही.

२०१८ उजाडले तेव्हा गुप्ता बंधूंचा वाईट काळ सुरू झाला होता. गुप्तांच्या कंपनीचे ई मेल्स लिक झाले, त्याला ‘गुप्ता लिक’ असं म्हटलं जातं. स्थानिक पत्रकारांनी गुप्तांच्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड केला. गुप्ता बंधूंवर मी लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप तंतोतत खरे निघाले. जेकब झुमा यांची पक्षातून हकालपट्टी झाली. त्यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला. गुप्ता बंधू देशाबाहेर पळाले. मात्र तोपर्यंत त्यांनी कमावलेले पैसे शेल कंपन्यांच्या माध्यमातून देशाबाहेर वळवले होते. २०१८ मध्ये माझे पुस्तक प्रकाशित झाले. गुप्ता बंधूंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या झोंडो कमिशनसाठी हे पुस्तक महत्त्वाचा दस्तावेज ठरले.

झोंडो कमिशनने मला साक्ष देण्यासाठी बोलावले. दक्षिण आफ्रिकेत संपूर्ण सुरक्षा पुरवली जाते. झुमा आणि गुप्ता बंधू यांच्या एकत्र बैठकीला उपस्थित असणारा मी एकमेव साक्षीदार आहे. माझे पुस्तक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आले आहे. दुसरीकडे झोंडो कमिशनपुढे हजर न झाल्यामुळे झुमांवर न्यायालयाचा अवमान करण्याचा ठपका ठेवून १५ महिन्यांची शिक्षा ठोठावली गेली आहे. झुमा दक्षिण आफ्रिकेचे शक्तिशाली नेते आहेत, जनतेची नस त्यांना कळते. मात्र नेल्सन मंडेला शिकलेले आणि वैश्विक विचार करणारे नेते होते. झुमा एकदम उलटे आहेत. शिक्षण फार नाही. पैशांसाठी ते काहीही करू शकतात. याचा फायदा गुप्ता बंधूंसारख्या लोकांनी घेतला, देशाच्या नैसर्गिक संसाधनाची लूट केली, सामान्य करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारला.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, त्यांचे ‘इंडेनचर : बिहाईंड सिन ॲट गुप्ता टीव्ही’ हे पुस्तक जगभरात गाजले.)

go to top