विक्रम गायकवाड
पाच जिल्ह्यांमध्ये विस्तार असणाऱ्या विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र राज्यातील सर्वोत्तम परिक्षेत्र ठरले आहे. कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये सुधारणा करतानाच, संवाद कौशल्यापासून पोलिसांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याशिवाय, नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे कामकाजामध्येही फायदा झाला आहे.
राज्यामध्ये १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आलेल्या अंतिम मूल्यमापनात विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र राज्यातील सर्वोत्तम परिक्षेत्र ठरले आहे. या निकालानुसार वेबसाइट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्द्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे कार्यालय म्हणून कोकण परिक्षेत्राची निवड करण्यात आली आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी कार्यालय आणि कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. या प्रयत्नांना मिळालेल्या यशामुळे कोकण परिक्षेत्राची राज्यातील सर्वोत्तम परिक्षेत्र म्हणून निवड करण्यात आली आहे.