दिलीप ठाकूर
glam.thakurdilip@gmail.com
स्थळ - वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओतील सेट क्रमांक एक. ‘गुमराह’च्या चित्रीकरणात श्रीदेवी दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या एका महत्त्वाच्या दृश्यासंदर्भातील सूचना ऐकतेय, ती अधूनमधून विचारत असलेल्या शंकाना महेश भट्ट व्यवस्थित उत्तरे देत असल्याने ती समाधानी आहे. हे दोघे बोलत असतानाच सेटवर प्रकाशयोजनेची लगबग सुरू आहे.
कॅमेरा तयारच आहे. श्रीदेवीची आई एका कोपऱ्यात शांतपणे बसली आहे. महेश भट्ट यांचा सहाय्यक येऊन त्यांना नजरेनेच सांगतो, ‘‘सब रेडी है.’’ महेश भट्ट पुन्हा एकवार श्रीदेवीला दोन-तीन गोष्टी सांगतात. सेटवर लाइट्स लागतात. महेश भट्ट यांचा प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक विक्रम भट्ट ओरडतो, सायलेन्स... लाइट्स, कॅमेरा, ॲक्शन आणि श्रीदेवी खरोखरच भूमिकेत शिरते.
काही मिनिटांपूर्वीच अतिशय नाॅर्मल असणारी श्रीदेवी हीच का, असा प्रश्न पडावा असा व इतका तिच्यात आश्चर्यकारक बदल पाहायला मिळतो. विक्रम भट्टचे पहिल्याच टेकला समाधान झालेले असते; पण श्रीला (श्रीदेवी श्री या इतक्याच नावाने ओळखली जात असे) वाटतं, काहीतरी चूक झाली असावी, म्हणून ती म्हणते, ‘‘वर मोर टेक...’’