Premium| ₹5 Lakh Emergency Fund: आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी ₹५ लाखांचा इमर्जन्सी फंड कसा तयार कराल?

Financial Security: अचानक आलेल्या खर्चांसाठी इमर्जन्सी फंड हे एक सुरक्षा कवच आहे. हे आर्थिक लक्ष्य गाठण्यासाठी अनेक सोपे मार्ग आहेत
Financial planning
Financial planningesakal
Updated on

आजच्या धावपळीच्या जीवनात कधी काय होईल हे सांगता येत नाही. अचानक नोकरी गेल्यावर, एखादा मोठा आजार झाला तर, किंवा घरात काही मोठी दुरुस्तीच निघाली तर पैशांची खूप मोठी अडचण येऊ शकते. अशा अवघड परिस्थितीत मदतीला धावून येतो तो म्हणजे 'इमर्जन्सी फंड'! हा फंड म्हणजे आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी एक आर्थिक सुरक्षा कवच आहे असं म्हणू शकतो. हा फंड तुम्हाला आर्थिक ताण-तणावापासून दूर ठेवतो आणि अशा अनेक अनपेक्षित खर्चांना सहज तोंड द्यायला मदतही करतो.

सर्वसाधारणपणे, प्रत्येक व्यक्तीकडे त्याच्या ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाएवढा इमर्जन्सी फंड असावा असं तज्ज्ञ सांगतात. अनेक लोकांसाठी ₹५ लाख ही एक चांगली सुरुवात आहे. हा आकडा पाहून घाबरून जाऊ नका! शिस्तबद्ध आणि योग्य नियोजनाने हे लक्ष्य गाठणं खूप सोपं आहे. चला तर मग, बघूया हा फंड कसा तयार करायचा, 'सकाळ प्लस'च्या या विशेष लेखातून.

समजा, तुमचा पगार ₹५०,००० आहे. तर तुमचा इमर्जन्सी फंड जवळपास दीड ते तीन लाख रुपयांचा असू शकतो. कसं? तर, असं म्हणतात की आपला इमर्जंसी फंड आपल्या ३ ते ६ महिन्यांच्या पगाराएवढा असणं अपेक्षित असतं. ₹५ लाखांचा फंड जरा अवघड वाटू शकतो, पण सातत्याने प्रयत्न केलात तर अगदीच साठवू शकता. तो साठवणं काही मोठी गोष्ट नाही, फक्त जराशी बचत करावी लागते!

सुरुवात कुठून करावी?

१. वेगळं बचत खातं उघडून सुरुवात करा

हा इमर्जन्सी फंड तयार करण्याचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपाय आहे. तुमच्या दैनंदिन खर्चासाठी जे खातं आहे, त्यातून इमर्जन्सी फंड वेगळा ठेवण्यासाठी एक नवीन बचत खातं उघडा. यामुळे तुमची बचत सुरक्षित राहील आणि तुम्ही चुकूनही इमर्जन्सी फंडातला पैसा इतर खर्चांसाठी वापरणार नाही.

यासाठी एक चांगलं खातं कसं निवडावं?

जास्त व्याज देणारं खातं: असं खातं निवडा, जिथे तुम्हाला तुमच्या बचतीवर जास्त व्याज मिळेल. अनेक खासगी आणि सहकारी बँका बचत खात्यांवर चांगला व्याजदर देतात.

लिक्विडीटी जास्त असलेलं खातं: गरज पडल्यास तुम्ही लगेच पैसे काढू शकाल असं खातं असावं. ऑनलाइन बँकिंग आणि डेबिट कार्डची सोय असलेले खातं जास्त सोयीचं ठरेल.

नियोजन कसं कराल?

तुमच्या पगाराच्या खात्यातून दर महिन्याला एक ठराविक रक्कम आपोआप या नवीन खात्यात जमा होईल अशी 'सिस्टिमॅटिक ट्रान्सफर' ची सेटिंग करून ठेवा. यामुळे तुमच्या बचतीला शिस्त लागेल आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगळा विचार करावा लागणार नाही. समजा, तुम्ही दर महिन्याला ₹१०,००० जमा करायचं ठरवलं, तर ४ वर्ष आणि २ महिन्यांत तुमचं ₹५ लाखांचं लक्ष्य पूर्ण होईल, तेही पैशांवर मिळणाऱ्या व्याजाशिवाय. तुम्ही दरमहा जास्त बचत करू शकलात तर हे लवकरही शक्य होईल.

२. सुरक्षिततेसाठी मुदत ठेवींचा विचार करा

तुमच्या इमर्जन्सी फंडातला काही हिस्सा मुदत ठेवींमध्ये म्हणजे FDs मध्ये ठेवा. बँकांमधील एफडी अत्यंत सुरक्षित मानल्या जातात आणि त्यातून तुम्हाला चांगला आणि निश्चित परतावा मिळतो.

एफडीचा उपयोग कसा करावा?

लहान-लहान एफडी करा: तुम्ही वेगवेगळ्या मुदतीच्या म्हणजे ६ महिने, १ वर्ष, २ वर्ष अशा अनेक छोट्या-छोट्या एफडी करू शकता. याला एफडी लॅडरिंग म्हणतात. यामुळे गरज पडलीच तर तुम्हाला एकाच वेळी मोठी रक्कम मोडायची गरज पडणार नाही. समजा, तुम्हाला ६ महिन्यांनी ₹५०,००० ची गरज पडली, तर तुम्ही फक्त तीच एफडी मोडून पैसे काढू शकता ज्यामुळे बाकीच्या एफडी तशाच राहतील.

लिक्विडिटीची सोय: मुदत ठेवी बचत खात्यासारख्या एकदम लिक्विड म्हणजे कधीही पैसे काढता येतील अशा नसतात. मात्र अनेक बँका एफडीवर ओव्हरड्राफ्टची सुविधा देतात. याचा अर्थ तुम्ही तुमच्या एफडीच्या रकमेवर कर्ज घेऊ शकता, ज्यामुळे गरज पडली तरी तुम्हाला पैशांची अडचण येत नाही आणि तुमची एफडी सुरक्षित राहते.

३. लिक्विड म्युच्युअल फंड ट्राय करा

लिक्विड म्युच्युअल फंड्स हे इमर्जन्सी फंडासाठी एक उत्तम पर्याय आहेत. हे फंड कमी कालावधीसाठीच्या सुरक्षित डेट फंडात गुंतवणूक करतात आणि बचत खात्यापेक्षा जास्त परतावा देतात.

लिक्विड फंड्सचे फायदे:

सोपी आणि जलद पैसे काढण्याची प्रक्रिया: या फंडातून पैसे काढण्याची प्रक्रिया खूप सोपी असते. तुम्ही सहसा २४ तासांच्या आत पैसे काढू शकता. काही फंड्स तर तुमच्या विनंतीनंतर लगेच पैसे तुमच्या खात्यात जमा करतात.

कमी जोखीम: लिक्विड फंड्समध्ये धोका किंवा रिस्क कमी असते, पण ती शून्य नसते, हे लक्षात ठेवा. कारण हे फंड परतावे बाजारातील छोट्या चढ-उतारांवर अवलंबून असतात. त्यामुळे इथे जास्त परताव्याच्या मागे न लागता, सुरक्षिततेला प्राधान्य द्या.

काय टाळायचं?

जोखमीची गुंतवणूक टाळा!

इमर्जन्सी फंड तयार करताना तुमचा मुख्य उद्देश सुरक्षा आणि लिक्विडिटी असला पाहिजे, जास्तीत जास्त परतावा मिळवणं नाही. त्यामुळे या फंडातले पैसे शेअर बाजार, इक्विटी म्युच्युअल फंड किंवा इतर जास्त चढ-उतार असलेल्या साधनांमध्ये गुंतवू नका. कारण संकटाच्या वेळी जर बाजारात मंदी असेल, तर तुम्हाला नुकसान सहन करून पैसे काढावे लागतील. इमर्जन्सी फंड म्हणजे तुमच्या कठीण काळातली मदत असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला मानसिक आधारही मिळेल.

हळूहळू पण नियमितपणे बचत करा

₹५ लाखांचं लक्ष्य खूप मोठं वाटू शकतं, पण नियमित आणि शिस्तबद्ध बचत केली तर तुम्ही तिथे नक्कीच पोहोचू शकता. तुमच्या पगारातून एक छोटीशी रक्कम जरी बाजूला काढली, तरी ती कालांतराने वाढत जाते.

या सर्व पर्यायांचा योग्य वापर करून, तुम्ही स्वतःसाठी एक सुरक्षित फंड तयार करू शकता. नियमितपणे बचत करा आणि एक मात्र लक्षात ठेवा, की हा पैसा फक्त खऱ्या इमर्जन्सीसाठीच वापरा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com