डॉ. अविनाश भोंडवे
आजच्या धकाधकीच्या जीवनात एका बाजूने प्रत्येकाचे ताणतणाव आणि जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूने मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे चिंता विकारांचे प्रमाण वाढले आहे. पण, आवश्यक ती काळजी घेऊन ते टाळता येतात आणि उद्भवल्यास उपचारानेे बरेही करता येतात.
आजच्या जीवनशैलीने आपल्याला अनेक आजारांच्या देणग्या बहाल केल्या आहेत. त्यात स्थूलता, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशांसोबत अनेक मानसिक विकारही आहेत. यामध्ये ‘चिंता विकार’ (अँग्झायटी डिसऑर्डर) हा सर्वाधिक प्रमाणात आढळतो.
तुम्ही ठरवा किंवा ठरवू नका, दैनंदिन जीवनात कशाची तरी चिंता वाटणे ही एक अत्यंत स्वाभाविक गोष्ट असते. पण या सर्वसाधारण चिंतेमध्ये आणि चिंता विकारात थोडा फरक असतो.
हा फरक समजण्यासाठी एक निरीक्षण करून पाहा. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याचे अवलोकन करा. कपाळावर आठ्या, भुवया आकसलेल्या, डोळे बारीक केलेले आणि ओठ दबलेले ही चिन्हे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसतील.
ही असते साधी चिंता. ती कदाचित वाहनांच्या गर्दीमुळे असते किंवा कामावर होणाऱ्या उशिरामुळे असू शकते. पण चिंता विकारात त्या व्यक्तीला सतत कमालीची काळजी, कशाची तरी खूप भीती वाटत असते. त्याच्या नेहमीच्या हालचालींमध्येदेखील प्रचंड अस्वस्थता आणि तणाव जाणवत असतो.