
प्रसाद भागवत
prasadmbhagwat@gmail.com
प्राचीन तंत्रविद्येत मांस, मद्य, मीन, मुद्रा आणि मैथुन या पाच ‘म’कारांचा उल्लेख आहे. ‘म’ अक्षराने सुरू होणाऱ्या या बाबी सर्वसामान्य माणसांकरिता तिरस्करणीय समजल्या गेल्या आहेत. अलीकडे ‘मंदी’चा ‘म’ ही या यादीत वाढवावा की काय? असा मोह मला होतो आहे.
कारण देशाच्या लोकसभा निवडणुकीनंतर आलेला तेजीचा बहर वेगाने ओसरून आता शेअर बाजारांत ‘मंदीबाईचा फेरा आला रे...’च्या हाकाट्या ऐकू येऊ लागल्या आहेत. अशी ही मंदी म्हणजे एक संधीही आहे.
सध्या जागतिक आणि भारतीय शेअर बाजारांत मोठी घसरण झाली असून, सातत्याने चढ-उतार होत आहेत. शेअर बाजारात जागतिक वित्तीय गुंतवणूकदारांनी सपाटून केलेली विक्री, अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळविल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयातीवर त्यातही ब्रिक्स देशांविरुद्ध कर वाढविण्याच्या धमक्या, भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणांत व्याजदरकपात करण्यात होणारी चालढकल, आपल्या कंपन्यांचे तुलनेने अपेक्षाभंग करणारे तिमाही निकाल अशा घटकांचा हा परिपाक आहे. या काहीशा निरुत्साही कालखंडांत छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायला हवे, याचा उहापोह येथे केला आहे.