AI Effect on the Job Market: आजचीच बातमी. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा एक लेख शेअर केला आहे. त्यामध्ये पुढच्या काही वर्षात लाखो 'व्हाईट कॉलर जॉब' जाणार असल्याचे विधान AI क्षेत्रातील एका नामांकित व्यक्तीने केले आहे. तर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी देखील आजच एक विधान केले आहे. त्यामध्ये त्यांनी 'मायक्रोसॉफ्ट' या कंपनीमधून ६ हजार कर्मचाऱ्यांना का काढण्याचा निर्णय घेतला याचे कारण सांगितले आहे. ते म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीत वापरून पाहायचा आमचा पहिला टप्पा असून त्याचाच भाग म्हणून आम्ही ६ हजार कर्मचाऱ्यांना कमी केले आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयीच्या रोज अशा बातम्या कानावर येऊन आदळतात तेव्हा तुमच्यासह सगळ्यांनाच भविष्यात आता आपल्या नोकऱ्यांचे काय होणार अशी भीती वाटून निराशा यायला लागते. करियरच्या मध्यावर असणारा रोहित म्हणतो, मी जेव्हा अशा बातम्या ऐकतो तेव्हा एक वेगळीच निराशा, चिंता मनात घर करते. माझ्यावर असणाऱ्या घराचे कर्ज, जबाबदाऱ्या या सगळ्याविषयी विचार सुरु होतो. घाबरायला होते. मनात येतं जग कोणत्या दिशेने जातं आहे.. माझ्या आयुष्यात पुढे काय होणार आहे..? खूपदा असंही वाटून जातं की जाऊदे, जे सगळ्यांचं होईल ते माझंही होईल.. जग ज्या दिशेने जाईल तसं आपण पण जाऊया...
आज अनेक तरुणांना अशाच प्रकारची भीती सतत सतावते आहे. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे की पुढच्या काही वर्षात फ्रेशर्सच्या टप्प्यावरच अनेक नोकऱ्या नाहीश्या होणार आहेत. सध्या शिकत असलेल्या अनेक मुलांना देखील आपण जे शिक्षण घेतो आहोत हे कालसुसंगत नाहीये याची जाणीव झाली आहे. जवळपास सर्वांनाच AI मुळे काय होऊ शकते याची जाणीव झाली असली तरीही याचे पुढे काय करायचे..? आपण याला बळी पडू नये यासाठी काय करायला हवे..? याची माहिती नाही. करियरविषयी वाटणारी ही भीती कशी काढता येईल..? हे सगळं आम्हीही शोधायचा प्रयत्न करतोय. 'सकाळ प्लस' च्या या लेखाच्या माध्यमातून हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया..!