पुणे : जेव्हा जेव्हा माझ्या हातच्या पोळी भाजीचं कौतुक होतं तेव्हा तेव्हा विचार येतो याचे मला व्यवसायात रूपांतर करता येईल का..? खरं तर कमी पडावं असं काही नाही पण मला वाटतं बास आता.. आणखी नोकरी नाही करायची. एकदम नोकरी सोडून व्यवसाय करणे देखील शक्य नाही. जबाबदऱ्या आहेत. व्यवसाय चालला नाही तर... फार मनुष्यबळ देखील नाही. भांडवलाला पैसा देखील नाही. कर्ज बिर्ज लगेच तरी घ्यायला नकोच वाटतंय...
कधी कधी वाटतं चाललेली घडी विस्कटवून आणखी करायला जाऊन आहे ते पण गमावून बसायला नको. पण तरीही वाटतं काहीतरी सुरू करायला हवं. आत्ता नाही करायचं तर कधी करायचं.
खासगी शाळेत शिक्षिका असणारी पूनम वयाच्या मध्यावर आल्यावर सांगत होती. ती म्हणाली, डबे वैगेरे करणे शक्य आहे पण त्यात सातत्य नाही. मला माझा ब्रॅंड तयार होईल असं काहीतरी करायचं आहे. लोक मी केलेल्या जेवणाचं खूप कौतुक करतात. पण मला असा विचार येतो की किती दिवस मी लोकांना जेवू घालू आणि त्यांनी केलेल्या कौतुकावर समाधान मानू... माझ्या जर हाताला चव आहे तर याचं पैशात रूपांतर व्हायला हवं...
सगळं कळतंय पण कुठून आणि काय सुरूवात करू कळेना..!
पुनमसारख्या अनेक महिलाच काय पण उत्तम स्वयंपाक येणारे पुरूषही आहेत, ज्यांना आपला छोटेखानी व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. पण फार पाठबळ नाही, अशांना क्लाऊड किचनचा पर्याय चांगला ठरू शकतो. पण क्लाऊड किचन कोणाला सुरू करता येते, त्यासाठी काय कागदपत्र लागतात, त्यासाठी किती खर्च येतो, तंत्रज्ञानाची माहिती नसताना हे करणं शक्य आहे का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया 'सकाळ प्लस' च्या या विशेष लेखातून..!