
हृदयनाथ मंगेशकर
editor@esakal.com
सकाळचे नऊ वाजले होते. मी घाईघाईने ‘प्रभुकुंज’चे जिने उतरत होतो. कारण जसलोक रुग्णालयाजवळच्या बस स्टॅाप वर मला जायचे होते, मी थोड्या नाही, बऱ्याच काळापासून त्रासात होतो. ५७ मध्ये आकाशवाणीवर तीन अतिशय लोकप्रिय गाणी देऊनही आकाशवाणीसाठी केलेले माझे काम संपले. आकाशवाणीने मला पुन्हा कधीही बोलावले नाही. मग मी तीन चित्रपटांची निर्मिती केली, पहिला चित्रपट होता, ‘अंतरिचा दिवा’. वि. स. खांडेकरांची कथा होती. मला फार आशा होती, की वि. स. खांडेकरांच्या लिखाणावर हा चित्रपट लोकप्रिय होईल, पण चित्रपट लोकांना आवडला नाही. लावणी चित्रपटाचे दिवस होते ते, लोकांनी चांगल्या साहित्याकडे पाठ फिरविली, किंवा वि. स. खांडेकरांचे लिखाण त्यांच्या डोक्यावरून गेले असावे.