

Importance of natural intelligence in the age of artificial intelligence
esakal
डॉ. किशोर पाकणीकर, नवनियुक्त ‘पीएम प्राध्यापक’
‘एआय’ ला खरे अनुभव नसतात. तिला नैतिक प्रश्न जाणवत नाहीत आणि आपल्या उत्तरांच्या परिणामांची जबाबदारी घ्यावी लागत नाही. माणसाला मात्र आपल्या कृतींची जबाबदारी घ्यावी लागते. चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे परिणाम त्यालाच भोगावे लागतात. इथेच माणूस आणि यंत्र यांच्यातला मोठा फरक दिसतो.
कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच ‘एआय’ आज अतिशय वेगाने पुढे जात आहे. काही वर्षांपूर्वी जी कामे फक्त माणूस करू शकतो असे वाटत होते, ती आता संगणकही करू लागले आहेत. शाळांमध्ये ‘एआय’चा वापर वाढत आहे. कंपन्या आपल्या कामकाजात ते आणत आहेत. सरकारेही त्यासाठी नियम बनवत आहेत. म्हणजे ही आता भविष्यातली गोष्ट राहिलेली नाही. ती आधीच आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. या वेगवान बदलांमुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. एआय इतक्या वेगाने पुढे जात असताना आपण आपली विचारशक्ती, म्हणजेच आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता, जाणीवपूर्वक वाढवत आहोत का?
नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय? आपला मेंदू सतत काम करत असतो. आपण विचार करतो, कल्पना करतो, निर्णय घेतो आणि दुसऱ्यांच्या भावना समजून घेतो. हे सर्व मेंदूमुळे शक्य होते. आपण जसा मेंदू वापरतो, तशा मेंदूमधल्या प्रक्रिया बदलत जातात. आपण वारंवार खोलवर विचार केला आणि कठीण प्रश्न सोडवले तर या प्रक्रिया अधिक मजबूत होतात. वापर कमी झाला तर त्या मंदावू शकतात. म्हणून नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणजे केवळ माहिती साठवणे नाही. ती म्हणजे गोष्टींचा अर्थ समजून घेणे, परिणामांचा विचार करणे आणि जबाबदारीने वागणे.