
उत्क्रांतीच्या मध्यकालीन टप्प्यानंतर माणसाला सत्तेचा मोह झाला. इतरांवर अधिकार गाजविण्यासाठी जमिनी पादाक्रांत करण्याकरिता, स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तो त्यानेच तयार केलेल्या मानवी मूल्यांशी संघर्ष करायला लागला. धर्माचा पगडा आणि स्वार्थी राजकारणाच्या संकरातून मानवी मूल्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. आज आपण या संघर्षाच्या एका अशा टप्प्यावर आहोत, जिथे आपल्याला उत्क्रांतीच्या टप्प्यातून प्रेरणा घ्यायला हवी. पुन्हा एकदा मूल्यांची गोळाबेरीज करायला हवी. मानवाला जाणीव झालेल्या सहवेदनेच्या कल्पनेपासून सदाचाराच्या संविधानतेपर्यंतचा हा प्रवास सोपा नाही.
आज आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहिल्या तर माणूस नेमका कोण, असा प्रश्न पडतो. माणसाला केवळ नकारात्मक अंत्यकर्माचे मंत्र जपण्यातच स्वारस्य आहे की काय, असा विचारही मनात डोकावून जातो. आपल्या सभोवतालची परिस्थिती अत्यंत नकारात्मक आणि निर्जीव झाली आहे. सचेत, सजीव अवस्थेतील जाणिवा बोथट झालेल्या जाणवतात. आपण ज्याला प्रगती म्हणतो तो विकासाचा वेग जेवढा वाढतोय तेवढ्याच मानवी भावनांच्या आणि जाणिवेच्या कक्षा आकुंचन पावताना दिसतात. ज्या मूल्यव्यवस्थेच्या जीवावर मानवी संवेदनांचा डोलारा उभा आहे त्याला तडा जायला लागला आहे.