

Technical Education in India
esakal
प्रा. मुकुल सुतावणे, संचालक
डॉ. मंदार कार्यकर्ते, कुलसचिव, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी- अलाहाबाद) प्रयागराज, उत्तर प्रदेश स्वातंत्र्योत्तर भारताला तांत्रिक व वैचारिक बळ देणाऱ्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांनी (आयआयटी, आयआयएम, एनआयटी व आयआयआयटी) देशाच्या प्रगतीचा पाया रचला आहे. आता ‘विकसित भारत@२०४७’चे स्वप्न साकारण्यासाठी या ज्ञानमंदिरांना जागतिक दर्जाचे संशोधन आणि तंत्रज्ञान निर्मितीचे मुख्य इंजिन बनावे लागेल.
ऑगस्ट १९५१ मध्ये २२४ विद्यार्थ्यांची पहिली तुकडी खडगपूरजवळील हिजली येथील एका माजी ब्रिटिश छावणीत दाखल झाली. उद्देश होता, भारताने यापूर्वी कधीही प्रयत्न न केलेल्या एका नव्या प्रकारच्या संस्थेत शिक्षणाचा श्रीगणेशा करणे. या जागेला स्वतःचा असा एक इतिहास होता. जेमतेम एका दशकापूर्वी तिथे स्वातंत्र्यसैनिकांना बंदी बनवून ठेवले होते. आता त्यांच्या जागी एक अभियांत्रिकी महाविद्यालय उभे होते, जी एका लहान स्वरूपात का होईना, पण स्वतंत्र भारताची कथा होती. वसाहतवादी नियंत्रणाच्या एका साधनाचे, आत्मनिर्भर भविष्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधेमध्ये रूपांतर केले जात होते. ‘आधुनिक भारताची मंदिरे’ हा वाक्प्रचार जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५६ मध्ये आयआयटी खडगपूरच्या पहिल्या दीक्षान्त समारंभात वापरला होता आणि नंतरही वारंवार वापरला गेला, त्याने आत्मनिर्भर राष्ट्रउभारणीच्या दिशेने भारताच्या वाटचालीची मुहूर्तमेढ रोवली.