
जयंत जाधव
‘आम्ही नगरसेवक...’ ‘आमदारांची माणसे...’ ‘आम्ही या गावचे भूमिपुत्र...’ असं सांगून स्वच्छतेचे (हाउसकीपिंग), कामगार वाहतुकीचे, सुरक्षारक्षक पुरविण्याचे, कामगार कंत्राटाचे, पाणी टँकर पुरविण्याचे, कॅन्टीन चालविण्याचे अशी पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधील ‘ए टू झेड’ कामे राजकीय वरदहस्त असलेल्या गुंडांनाच मिळाली पाहिजेत, असा एक ‘बेकायदा’ पायंडाच पडला आहे. राज्यात सरकार कोणाचेही असो या पायंड्यात काहीही फरक पडत नाही. गुंडगिरीपुढे कंपन्या जिल्ह्याबाहेर नेऊ, अशी शक्यता काही गांजलेले उद्योजक खासगीत व्यक्त करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील चाकण, रांजणगाव, शिक्रापूर, कोंढापुरी, तळेगाव, वडगाव, हिंजवडी, बारामती, इंदापूर, कुरकुंभ, पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरातील औद्योगिक वसाहती व आयटी क्षेत्रांत राजकीय गुंडांचा कंपन्यांना त्रास ही नित्याचीच बाब झाली आहे.