
अरविंद जगताप
jarvindas30@gmail.com
संस्कृती जगाची, देशाची, राज्याची असते. ती जन्म प्रमाणपत्रात नसते. ती माणसाच्या चारित्र्यात असते; पण आपण जातीत किंवा हे मुंबईवाले, ते पुण्यावाले यातच जास्त अडकतो आणि खूप वर्षांपासून आपल्यातल्याच कुणाला दम देत म्हणतो, ‘मराठी समजत नाही? इंग्रजीत सांगू?’ म्हणजे काय? इंग्रजीत नीट समजेल, असं का वाटतं आपल्याला?
आपल्या पिढीची अनेक माणसं मराठी भाषेबद्दल तळमळीने बोलत असतात. समाजमाध्यमावर खंत व्यक्त करत असतात; पण खरं तर हीच मराठी भाषेची एक सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. तरुण पिढी, लहान मुलं-मुली या विषयावर किती बोलतात? किंवा मराठी किती बोलतात? पुढच्या पिढीला काय काय द्यायचं, हा विचार करताना आपली मराठी भाषा पण द्यायची, हे लक्षात राहिलं नाही.