
esakal
श्रीराम पवार
shriram1.pawar@gmail.com
विधानसभा निवडणुकीला सामोरा जाणारा बिहार राजकीयदृष्ट्या एका वळणावर उभा आहे. जवळपास तीन दशकांच्या राजकारणात ही निवडणूक काही व्यापक बदल आणू शकते. जदयू आणि भाजपची आघाडी की राजद आणि काँग्रेसची आघाडी सत्ता मिळवणार इतकाच मुद्दा या निवडणुकीत नाही. मंडल - कमंडलच्या राजकारणानंतर देशात ज्या उलथापालथी झाल्या, त्यात बिहार हे आघाडीचं राज्य होतं.
यावर लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे दोन चेहरे स्वार झाले. सामाजिक न्यायाच्या लढाईवर बोलणारे बाकी सारे क्रमानं मागं पडत गेले. दुसरीकडं फारसं अस्तित्वच नसलेला भाजप आपला आकार वाढवत गेला. या प्रक्रियेत कॉँग्रेस कमालीची अशक्त बनली. बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद आणि नितीशकुमार हे दोन ध्रुव बनले. त्यांच्याविना सत्तेचं राजकारण अशक्य होतं.