
डॉ. सतीश वाघ
अमेरिकी वाढीव आयातकरामुळे भारतीय रसायननिर्मिती क्षेत्रासमोर आव्हान उभे राहणार आहे. रसायननिर्मिती धोरणाची फेररचना करून उत्पादन, बाजारपेठा, निर्यात या सर्वांचा फेरआढावा घेतल्यास या आव्हानातून नवी संधी निर्माण होऊ शकते.
रसायन निर्मितीत महाराष्ट्राचा वाटा देशात एकूण उत्पादनाच्या १७.५२ टक्के आहे. राज्यातून दरवर्षी अमेरिकेसह अन्य देशांत देशात ४.४३ अब्ज डॉलरची रसायने निर्यात होतात. भारत हा जगातील सहावा सर्वांत मोठा, तर आशियातील तिसरा सर्वांत मोठा रसायन उत्पादक देश आहे. रसायनांचे उत्पादन मूल्य ‘जीडीपी’च्या सुमारे सात टक्के आहे. जागतिक रसायन उद्योगातील भारताचा वाटा तीन टक्क्यांच्या आसपास आहे. हा उद्योग देशात २० लाख लोकांना थेट रोजगार देतो. भारतीय रसायननिर्मिती उद्योगात, घातक रसायने सोडून अन्य क्षेत्रात शंभर टक्के थेट परकीय गुंतवणुकीस मुभा आहे.