

Children artistic talent
esakal
किशोर बळी - sakal.avtaran@gmail.com
कला माणसाचे जीवन सुंदर करते. ती जगण्याचे बळ होते. म्हणून जो जितका अधिक पैसा कमवतो तो तितका जास्त यशस्वी, ही धारणा बदलली पाहिजे. आपण कलावंताचा शोध घेतला पाहिजे आणि चिमुकल्या लेकरांना हा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
‘हे कोनतं चित्र काढलं बे? असे कागदं रंगोल्यानं पास होनार हायेस काय तू? अभ्यासात बोंब पाडनं जराशीक. मोठा चालला चित्रकार व्हयाले!’
‘‘काहाले फालतू वगारून राह्यला बे? गाने म्हन्याचा टाईम हाये काय हा? अभ्यासात दिवे लावनं बाबू!’’
‘हे असं ट ले ट जोडून कविता होत असते काय? अन् कविता केल्यानं पोट भरत असते काय? पह्यले अभ्यास कर. नवकरी लागू दे अन् मंग कराव हे रिकामे धंदे!’
केवळ आमच्या विदर्भातच नव्हे, तर कुठल्याही ग्रामीण भागात हे असे संवाद सातत्याने कानावर पडतात. कलेचे महत्त्व काय आहे, याचेच अनेकांना ज्ञान नाही अथवा त्यांना कलेशी कुठलेही घेणे-देणे वाटत नाही. म्हणून कित्येक प्रतिभांना उमलण्याआधीच कोमेजून जावे लागते, हे कटूसत्य नाकारता येत नाही. आपल्या लेकराच्या ठायी असलेली प्रतिभा ही त्याला आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे करू शकते आणि त्या कलेमुळे तो प्रतिष्ठेने जगू शकतो, जगभर नाव कमावू शकतो, हे समजण्याइतकी प्रगल्भता ग्रामीण भागातील पालकांमध्ये शिक्षणाअभावी वा व्यावहारिक जगाच्या असंवेदनशील आणि चुकीच्या धारणांमुळे रुजू शकली नाही, हे खरेतर मोठे दुर्दैव आहे.