
संजय कुमार
नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात (एनसीएफ) प्रादेशिक भाषांमध्ये मूलभूत शिक्षण देण्यावर टाकलेला भर स्वागतार्ह आहे. मात्र, आपण जागतिकीकरणाच्या युगात आहोत आणि या युगातील गरजा लक्षात घेता, इंग्रजी भाषेतील शिक्षणालाही योग्य महत्त्व देणे गरजेचे आहे. इंग्रजी ही परदेशी भाषा आहे, अशी टीका होत असते.
तरीही दैनंदिन आयुष्यामध्ये इंग्रजीला असणारे महत्त्व आपण नाकारू शकणार नाही. सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक आणि आर्थिक प्रगतीमध्येही इंग्रजीचे महत्त्व आहे, ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे. आज देशातील हजारो तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. त्यांनाही इंग्रजीचे महत्त्व ज्ञात आहे. केवळ नवी नोकरी मिळविण्यासाठीच नव्हे, तर व्यावसायिक व सामाजिक उन्नतीसाठीही इंग्रजी ही महत्त्वाची गोष्ट आहे, हेही तरुण वर्ग जाणतो आहे.