केदार गोरे
gore.kedar@gmail.com
वाघ किंवा इतर वन्यजीव पाहताना आपण ‘त्यांच्या’ घरातील पाहुणे आहोत आणि पाहुणे म्हणून शिष्टाचार पाळण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याचा पर्यटकांना विसर पडल्याचे अनेकदा दिसून येते. जंगलात वाघ दिसेल, अशी आशा ठेवणे स्वाभाविक आहे; परंतु तो दिसलाच पाहिजे, असा अट्टहास करून गैरशिस्तीपणाचे वर्तन करणे निंदनीय आहे.
वर्षी एप्रिल महिन्यात मध्य प्रदेश येथील बांधवगढ व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध ताला पर्यटन क्षेत्रात सकाळच्या सफारीला जाण्याचा योग आला. साल वृक्षांच्या जंगलात उन्हाळ्यातही गारव्याचा सुखद अनुभव घेत आणि पक्षी, वृक्ष, फुले व प्राण्यांचे सौंदर्य अनुभवत आमची सफारी सुरू होती. अनेक गाड्या जंगलातील व्याघ्र राजाला शोधण्यात मग्न होत्या. आमच्या गाडीतील गाईडला आपण पक्षी बघत बघत जायचे आहे हे मी आधीच सांगितले असल्यामुळे फक्त वाघांच्या शोधात फिरणे तो टाळत होता; पण तरीही सवयीप्रमाणे रस्त्यालगतच्या मातीत पाऊलखुणा शोधण्याचे त्याचे काम चालू होते.
अधूनमधून दुसऱ्या गाड्यांमधील आपल्या दोस्तांना वाघांच्या हालचालींविषयी काही माहिती आहे का, ते विचारतही होता. साधारण दोन तासांनी, म्हणजे आठ वाजता अचानक रस्त्यावरून चालत येणारा एक भलामोठा नर वाघ दिसला. त्याच्या आकारमानामुळे स्थानिक लोकांनी त्याचे नामकरण ‘बजरंग’ असे केले आहे. नर वाघ सहसा दृष्टीस पडत नाहीत.