
शहाजी बा. मोरे
चालू वर्षात अनेक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक घडामोडींचे आपण साक्षीदार असू. संशोधनाच्या प्रगतीनंतर मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे बदल संभवतात. त्या बदलांवर दृष्टिक्षेप.
वर्षांमागून वर्षे जात असतात; कालप्रवाह मात्र अखंड चालत असतो. विज्ञान-तंत्रज्ञानही अखंड चालत असते. एकेक वर्ष या कालप्रवाहातील एक टप्पा असतो. तसाच विज्ञान-तंत्रज्ञानासाठीही एक वर्ष हा एक छोटा टप्पाच समजला जातो. २०२५ मधील वैज्ञानिक घडामोडी पुढील कित्येक वर्षांतील वैज्ञानिक प्रगतीवर प्रभाव टाकणाऱ्या असतील, त्यामुळेच त्यांची नोंद घ्यायला हवी.
चालू २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पुंजविज्ञान-तंत्रज्ञान वर्ष असेल. क्वांटम म्हणजे प्रारणातील उर्जेचा एक पुंज (क्वांटम). प्रकाश किंवा प्रारणे सलग प्रवाहित असताना लहरीप्रमाणे प्रवाहित होतात, असा एक सिद्धान्त आहे. त्याचप्रमाणे प्रकाश-कण स्वरूपही(पार्टिकल थिअरी) आहे, असाही एक सिद्धान्त आहे. हे दोन्ही सिद्ध झाले आहेत.