

T20 World Cup2026
sakal
शैलेश नागवेकर
मुख्य संघांशी सामने खेळण्याची संधी मिळाली तर मुख्य स्पर्धेच्या वेळी आम्हीही तयार झालो असतो, अशी खंत स्कॉटलंड आणि नेदरलँड्स संघांच्या कर्णधारांनी व्यक्त केली. वर्गात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याच्या शेजारी बसून तो कसा अभ्यास करतो, हे जाणून घेतले तरी आपल्या गुणांच्या टक्केवारीत बदल करण्यासाठी ते दिशादर्शक ठरू शकते...
टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा पहिला टप्पा पार होऊन आता सुपर-८ने खरी स्पर्धा सुरू झाली, असे म्हणायला हरकत नाही. या आखाड्यात तेल लावलेला जुना पैलवान ऑस्ट्रेलियाचा समावेश नाही, हे काहीसे अनपेक्षित म्हणायला हवे. यात काहीसा हा शब्द जाणीवपूर्वक वापरलाय कारण, म्हटले तर या संघाने प्रगती करावी, असा जोरच त्यांच्यात नव्हता. पूर्वीसारखा दरारा आता नावापुरताच राहिलेला हा संघ होता. पॅट कमिंस आणि जॉश हॅझलवूड यांच्या दुखापतींमुळे अनुपस्थितीने गोलंदाजीत विकलांग झालेला हा संघ फलंदाजीत एक ट्रॅव्हिस हेड सोडला तर दृष्टिहीनही झालेला. ग्लेन मॅक्सवेल यावर ते अजूनही भरवसा ठेवतात, यातच सर्वकाही आहे.