

Nashik City Pollution
esakal
विक्रांत मते
नाशिक शहराचा वेगाने विस्तार होत आहे, त्याचबरोबर शहरातील प्रदूषणाची समस्याही गंभीर होत आहे. तूर्त शहरातील प्रदूषणाचे प्रमाण ठिक आहे, तरीही त्यातून धोक्याचे संकेत मिळत आहेत. या प्रदूषणावर वेळीच उपाय केले नाहीत, तर भविष्यात ही समस्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरेल, यात शंका नाही.
मुंबई, पुण्यापाठोपाठ वेगाने वाढणाऱ्या राज्यातील शहरांमध्ये नाशिक आघाडीवर आहे. नाशिकचा शहरी अधिक ग्रामीण बाज आता बाजूला पडून, शहराची महानगराकडे वाटचाल होताना दिसत आहे. मात्र, नाशिकची श्रीमंती काँक्रिटच्या टोलेजंग इमारती किंवा इतर भौतिक साधनांनी मोजत असताना शहराच्या आरोग्याकडे दुर्लक्षित होत असल्याचे दिसते. सद्यस्थितीत हवा, जल, वायू या शहरी आरोग्याच्या मापदंडांचा विचार केल्यास परिस्थिती ठिकठाक दिसत असली, तरी भविष्यातील अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी आताच तजवीज करावी लागेल; अन्यथा शहर वाढल्याचा आनंद भावी पिढीच्या नाकातोंडाला रुमाल बांधून सार्वजनिक ठिकाणी फिरायला लावणारा ठरू शकतो.