
Oilseed Agriculture
esakal
अन्नसुरक्षा, पोषणमूल्य सुरक्षा, आर्थिक उत्पन्न संधी आणि पर्यावरणपूरकता हे कृषी क्षेत्रातील चार महत्त्वाचे स्तंभ आहेत. यातील एक साध्य करून दुसरे साध्य केले नाही तर चालणार नाही. कृषी तंत्रज्ञान कुठल्याही देशाचे घ्यावे. त्याने स्वयंपूर्णता साध्य झाली पाहिजे. आपल्याकडील पारंपरिक कृषिज्ञानाचे वैज्ञानिक निकषावर योग्य वर्गीकरण अन् दस्तावेजीकरण करून त्यासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुवर्णमध्य साधला पाहिजे. पोषक तृणधान्याचा (मिलेट) वापर अन्नसुरक्षेला धोका निर्माण न होता झाला पाहिजे.
कृषी क्षेत्रात स्वयंपूर्णता-आत्मनिर्भरता म्हणजे काय, हे आधी आपण समजून घेऊयात. राजकीय नेते असा दावा करतात, की भारत कृषी उत्पादनात आपण स्वयंपूर्ण आहे. परंतु आपण फक्त गहू-तांदूळ अशा धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण आहोत. त्यातही गहूउत्पादनही काठावरच असते. तांदळाबाबतीत मात्र आपण स्वयंपूर्ण असून, प्रमुख निर्यातदारही आहोत. मका उत्पादनात आपण कधी स्वयंपूर्ण असतो तर कधी नसतो. म्हणजे आपण धान्य उत्पादनात काही प्रमाणात स्वयंपूर्ण आहोत. धान्य उत्पादनही घटण्याची जोखीम त्यात आहेच. डाळ उत्पादनाबाबत मात्र आपण आजतागायत स्वावलंबी होऊ शकलो नाही. पंतप्रधान मोदींनी नुकतेच ११ हजार ४४० कोटी रुपये खर्चाच्या ‘दलहन आत्मनिर्भरता अभियान’ ही डाळ उत्पादनासाठी स्वयंपूर्णता मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत सहा वर्षांत डाळ उत्पादनात स्वयंपूर्णता गाठण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. स्वातंत्र्यानंतर फारच उशिरा आता असे अभियान आपण सुरू करत आहोत.