संजय कुमार, प्राध्यापक,
सीएसडीएस अर्थात सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज
गेल्या काही दिवसांत घडलेल्या वेगवान राजकीय घटना पाहता इंडिया आघाडीत मतभेदांची दरी वाढत असल्याचे लक्षात येत आहे. केवळ एखाद्या दुसऱ्या मुद्द्यांवरचा मतभेद आपण मान्य करू मात्र आघाडीत परस्परविरोधी विचारधारा व राज्य पातळीवरील राजकीय वर्चस्वावरून अनेक विषयांवर मतभेद वाढत आहेत.
इंडिया आघाडीचे घटक पक्ष नुकत्याच झालेल्या विविध विधानसभा निवडणुकीत जागावाटपात अयशस्वी ठरले. हरियानातील पराभवापासून आघाडीने खरे पाहता धडा शिकायला हवा होता. कॉँग्रेसने जर आम आदमी पक्षासोबत आघाडी केली असती तर हरियानातील निकाल निश्चितच वेगळे राहिले असते. पण त्यानंतरही आघाडीतील घटक पक्ष या घटनांपासून शिकायला तयार नाहीत.