
भारत आणि चीन यांच्यातील संबंधाला ६२ च्या युद्धाची पार्श्वभूमी आहे, आशिया खंडात आपणच श्रेष्ठ ही चीनची खुमखुमी ही या संबंधातली मोठी अडचण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे बेभरवशाचं धोरण भारताला चीनच्या जवळ नेत असून रशियालाही असं वातावरण हवेच आहे. भारत-चीन-रशिया अशी आघाडी त्यांच्या फायद्याची आहे. मात्र या सगळ्यात चीनचे संशयास्पद वर्तन आणि भारताबरोबरची त्याची आजपर्यंतची वागणूक हा मोठा अडथळा आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपलं वाटाघाटीचं सारं कौशल्य पणाला लावत असताना त्यांच्या रणनीतीचा एक साइड इफेक्ट म्हणून गलवान संघर्षानंतर गोठलेल्या भारत-चीन संबंधाना पुन्हा ऊर्जा मिळण्याची शक्यता तयार झाली. त्यातच युक्रेन युद्ध समाप्तीच्या बोलण्यावरून ट्रम्प यांच्याशी संवाद साधताना भारत आणि चीनसोबत एक आघाडी साकारण्याची शक्यता रशिया पुन्हा आजमावतो आहे. अमेरिकी टेरिफभोवती सारं जागतिक चर्चाविश्व फिरत असताना सुरू झालेला हा नवा भू-राजकीय खेळ लक्षवेधी आहे.
अमेरिका ज्या रीतीनं भारताशी व्यवहार करते आहे, त्या स्थितीत भारतासाठी अन्य पर्याय शोधावे लागतील. त्यात चीनचा अपवाद असायचं कारण नाही. गलवाननंतर आता चीनशी सलगी कशासाठी, ही टीका सोसूनही आजघडीला ते अनिवार्य पाऊल असू शकतं, मात्र चीन प्रसंग पडताच दगाबाजी करू शकतो हे नेहरूंपासून मोदींपर्यंतच्या काळात तेच दुखणं आहे. चीनशी मैत्रीत तोच चीन, तोच पेच कायम आहे. मुद्दा चीनशी जवळिकीचा नाही. ती साधताना विश्वास किती ठेवयाचा हा प्रश्न संपत नाही. कारणही तेच ६५ वर्षांचा इतिहास.